Poultry Farming:- कुठल्याही व्यवसायाची सुरुवात छोटेखानी स्वरूपामध्ये करून मेहनत आणि कष्टाने काम करत व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर वाढवणे हे खूप महत्त्वाचे असते. कारण व्यवसायामधील वाढ किंवा विस्तार जर करायचा राहिला तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले प्रयत्न आणि कष्टांमधील सातत्य खूप गरजेचे असते व हे करत असताना कितीही प्रकारच्या अडचणी आल्या तरी न डगमगता त्या अडचणींवर मात करत वाटचाल करत राहणे खूप गरजेचे असते.
तेव्हा कुठे छोट्याशा व्यवसायांचे रोपटे वटवृक्षापर्यंत पोहोचते. अगदी या मुद्द्यालाच धरून जर आपण पैठण तालुक्यातील पांगरा येथील शेतकरी शिवाजी लिंबाजी क्षीरसागर यांची यशोगाथा बघितली तर ती वरील मुद्द्याला नक्कीच साजेशी अशी आहे
1993 मध्ये त्यांनी 500 पक्षांपासून पोल्ट्री व्यवसायला सुरुवात केली व या तीस वर्षाच्या कालावधीत अनेक चढउतार अनुभवत आज पोल्ट्री व्यवसाय त्यांनी मोठ्या स्तरावर विस्तारला आहे व या पोल्ट्रीच्या जीवावरच त्यांनी चार एकर शेती पासून 31 एकर पर्यंत शेती वाढवली आहे.
क्षीरसागर कुटुंबाची पोल्ट्री व्यवसायातील यशोगाथा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पैठण तालुक्यात असलेल्या पांगरा या गावचे शिवाजी लिंबाजी क्षीरसागर यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती होती व या शेतीला काहीतरी व्यवसायाची जोड द्यावी म्हणून त्यांनी 1993 यावर्षी पाचशे पक्षांपासून कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली.
तसेच पारंपारिक पिकांना फाटा देत शेतीमध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. परंतु कुक्कुटपालन व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी गेल्या 30 वर्षांमध्ये या व्यवसायात अनेक चढउतार अनुभवले.
परंतु न डगमगता त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला व आज पोल्ट्री व्यवसायाच्या जीवावर त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित चार एकर शेती ही 31 एकर पर्यंत वाढवण्यात यश मिळवलेले आहे.
आज त्यांच्याकडे 31 एकर जमीन असून त्यातील तब्बल पाच एकर क्षेत्रावर 31 फूट×500 फूट आकाराचे पाच पोल्ट्री शेड असून या सर्व शेड मधून वर्षाला आठ ते नऊ बॅच ते काढतात.
या पाच शेडच्या माध्यमातून ते जवळपास 60 हजार पक्षांचे संगोपन करतात. पाण्याच्या सोयीकरिता दोन एकरमध्ये विहिरीत असेच बोरवेल व इतर सोयी केल्या आहेत.
तसेच तीन एकर सिताफळ बाग देखील आहे. उरलेल्या क्षेत्रांमध्ये पोल्ट्री व्यवसायासाठी खाद्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून मका पिकाचे उत्पादन ते घेतात.संपूर्ण पोल्ट्री शेडमध्ये पक्षांना खाद्य आणि पाण्याकरिता ऑटोमॅटिक यंत्रणेचा वापर करण्यात आला असून स्वतःच्या फीड मिलमधून मका भरड व इतर खाद्य तयार करून ते थेट पक्षांपर्यंत पोचत असल्यामुळे त्याचा त्यांना खूप मोठा फायदा होतो.
विशेष म्हणजे त्यांना या सगळ्या कामांमध्ये त्यांच्या पत्नी सुनंदाताई क्षीरसागर आणि मुलगा शुभम यांचा खूप मोलाचा हातभार लाभतो. स्वतः ते मका किंवा इतर खाद्याची खरेदी तसेच पक्षांची विक्री इत्यादी आघाडीवर काम सांभाळतात.
घरच्या लोकांच्या मदतीने संपूर्ण देखभाल होत असल्यामुळे मजुरांचा खर्च देखील कमी होतो व वेळोवेळी पक्षांचे निरीक्षण करणे सोपे जात असल्याने पोल्ट्री व्यवसायातील मॅनेजमेंट मधील अडचणी पटकन लक्षात येऊन त्या दूर करता येतात.
पोल्ट्री 25 ते 30 क्विंटल पर्यंत मका ते इतर शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे एका वर्षामध्ये या पोल्ट्री शेड मधून जवळपास पाचशे ट्रॉली कोंबडी खत निघते. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडून ते मका खरेदी करतात त्यांना तीन हजार रुपये ट्रॉली प्रमाणे ते विक्री करतात.