स्पेशल

अर्धा एकरमध्ये काकडी लागवडीतून 3 महिन्यात मिळवला 2 लाखांचा नफा! केला या तंत्रज्ञानाचा वापर

Farmer Success Story:- शेती व्यवसाय म्हटले म्हणजे कायम वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा डोंगर हा शेतकऱ्यांसमोर उभा असतो व या सगळ्या समस्यांना तोंड देत शेतकरी या व्यवसायामध्ये टिकून असल्याचे आपल्याला दिसून येते. कायमच येणाऱ्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपदा, हवामानातील बदल तसेच घसरलेले बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांना कायम मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटीला तोंड द्यावे लागते व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका देखील बसतो.

या सगळ्या समस्यांना तोंड देत शेतकरी आता तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेती कशी परवडेल या उद्देशाने आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसून येतात.

शेतीमध्ये आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आल्याने अनेक शेतकरी कमी क्षेत्रात देखील चांगले उत्पादन मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये हवामान बदलाला तोंड देताना हवामान नियंत्रित शेती पद्धतीचा जर आपण प्रयत्न पाहिला तर यामध्ये शेडनेटची भूमिका खूप महत्त्वाची ठरते.

याच शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर करत पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील प्रयोगशील शेतकरी ज्ञानदेव कोरडे यांनी काकडीचे पीक घेतले व त्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा मिळवला आहे. म्हणजे शेडनेटच्या तंत्रज्ञानातून कमी कालावधीत व कमी खर्चात चांगला पैसा कसा मिळवता येतो हे आपल्याला या माध्यमातून समजून येते.

शेडनेटमध्ये केली काकडीची लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील ज्ञानदेव कोरडे हे प्रयोगशील शेतकरी असून ते शेतीमध्ये कायम नवनवीन पिकांचे प्रयोग करत असतात व शेती सोबतच त्यांचा रोपवाटिकेचा व्यवसाय आहे.

शेतीमध्ये अनेक प्रयोग करत असताना त्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून शेडनेटचा लाभ मिळाला व तीन महिन्यांपूर्वी त्यांनी शेडनेट शेतामध्ये उभारले. सुरुवातीला त्यांनी शेडनेटमध्ये काकडीचे पीक घेण्याचे ठरवले व काकडीची लागवड साधारणपणे अडीच महिन्यांपूर्वी केली.

विशेष म्हणजे काकडीचे वाण निवडताना ज्या वाणाला परागीभवनाची गरज नाही अशा व्हरायटीची निवड केली. आज त्यांच्या या काकडीची काढणी सुरू झाली असून आतापर्यंत जवळपास 15 टनापेक्षा जास्त काकडीची विक्री करण्यात आली आहे व सध्या बाजारात पंधरा ते पन्नास रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

पंचवीस हजार रुपये बियाण्यावर खर्च त्यांनी केला व त्याशिवाय लागवड, शेणखत तसेच रासायनिक खते, फवारण्या तसेच काकडीच्या वेलींची बांधणी, ठिबक व मल्चिंग पेपर तसेच लागणारी इतर मजुरी असा तीन महिन्यांमध्ये एक लाख रुपयांचा खर्च केला.

आज त्यांच्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये जवळपास 2500 काकडीचे वेली आहेत व प्रत्येक वेलीला दहा किलो काकडीचे सरासरी उत्पादन मिळाले तरी एकूण 25 टन माल निघेल अशी अपेक्षा त्यांना आहे. सध्या दहा ते पंधरा रुपये एव्हरेज दर काकडीला मिळत आहे व एकूण उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

यामध्ये एक लाख रुपये खर्च वजा केला तर दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना शिल्लक राहणार आहे. अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून कमी क्षेत्रात आणि कमी कालावधीत लाखोंचे उत्पन्न कसे मिळवता येते हे ज्ञानदेव कोरडे यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil