Pune – Aurangabad Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. शेकडो किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच काही महामार्गांचे काम अजूनही सुरुचं आहे. तर काही महामार्गांचे काम प्रस्तावित आहे. असाच एक प्रकल्प म्हणजे पुणे-छत्रपती ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे. खरंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.
दररोज या दोन्ही शहरादरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र या रस्त्यावर होत असणाऱ्या कोंडीमुळे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास हा खूपच कठीण होऊन बसला आहे. हेच कारण आहे की या दोन्ही शहरादरम्यान नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे विकसित केला जाणार आहे.
आता याच नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गाच्या अलाइनमेंट मध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे प्रस्तावित पुणे-छत्रपती संभाजी नगर ग्रीन फील्ड महामार्ग समृद्धी महामार्ग सोबत जोडला जाणार आहे.
या मार्गाचे अलाइन्मेंट बिडकीन वसाहतीच्या दक्षिण-पूर्व टोकाला जोड रस्त्याला जोडणारे होते. परंतु आता ते बिडकीन ऑरिक वसाहतीच्या लगत थेट पैठण रस्त्याला जोडले जाईल आणि पुढे वाळूजच्या दक्षिण-पश्चिम दिशेने समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
जर समजा हा प्रस्ताव अंतिम झाला तर बिडकीन नोड थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. खरेतर यां महामार्गाचे अलाइनमेंट एन एच आय आणि राज्य रस्ते विकास महामंडळकडून तयार करण्यात आले होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एन एच आय आणि महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळात एक सामंजस्य करार झाला.
यानुसार या रस्त्याचे काम महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडे ट्रान्सफर करण्यात आले. पण महामंडळाकडे काम ट्रान्सफर होताच बरोबर आता या महामार्गाच्या अलाइनमेंट बदल होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान आता आपण हा महामार्ग प्रकल्प नेमका कसा आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे पुणे-छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्ग
हा महामार्ग 225 किलोमीटर लांबीचा आहे. हा सहा पदरी महामार्ग आहे. या महामार्गासाठी 25000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प बी ओ टी तत्त्वावर पूर्ण केला जाणार आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन ते सव्वा दोन तासात पूर्ण करता येईल असा दावा केला जात आहे.
सध्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 5 तासांपर्यंतचा वेळ लागतोय. हा महामार्ग आता समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असा दावा केला जात असल्याने भविष्यात नागपूर ते छत्रपती संभाजी नगर अन पुढे पुण्यापर्यंतचा प्रवास देखील सुपरफास्ट होणार आहे.