Pune Expressway News : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे, नाशिक आणि मुंबई ही तिन्ही शहरे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखली जातात. म्हणून या शहरांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या तिन्ही शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात.
दरम्यान आता पुण्याला एका नवीन महामार्गाची भेट मिळणार असे वृत्त हाती आले आहे. या नव्या महामार्गामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असलेल्या पुणे शहरातून साईनगरी शिर्डीला अवघ्या काही तासात पोहोचता येणार आहे.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिर्डी हा प्रवास अवघ्या तीन तासात पूर्ण होईल. यामुळे पुण्यातील साईभक्तांना दिलासा मिळणार आहे. पुणे ते नाशिक दरम्यान औद्योगिक महामार्ग विकसित केला जाणार आहे.
या महामार्गामुळे पुण्यातील नागरिकांना राजगुरुनगर, चाकण मंचर मार्गे थेट नाशिकला जाता येणार आहे. भविष्यात पुण्यातील साई भक्तांना साई दर्शनासाठी जलद गतीने पोहोचता येणे शक्य होणार आहे.
दरम्यान याच महामार्ग संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. या महामार्गाच्या संरेखनास मंजुरी मिळाली असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या वर्षी जूनमध्ये हा प्रकल्प सादर केला होता. यानंतर महामंडळाने या प्रकल्पाला मान्यता दिली. आता केंद्रातील मोदी सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.
हा मार्ग 213 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. सध्या पुणे ते नाशिक असा प्रवास करण्यासाठी पाच तासांचा वेळ लागतोय मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी तीन तासांवर येणार आहे.
कसा असणार रूट ?
हा महामार्ग पुण्यातून सुरू होईल मग राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे थेट शिर्डीला येईल अन पुढे नाशिक सोबत जोडला जाणार आहे. हा मगामार्ग तीन टप्प्यात जोडला जाणार अशी माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.
पहिला टप्पा हा 135 किलोमीटर लांबीचा पुणे ते शिर्डी असा राहील, दुसरा टप्पा 60 किलोमीटर लांबीचा शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंजपर्यंत राहील हा भाग सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेचा आहे. या महामार्गाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा नाशिक-निफाड इंटरचेंज ते नाशिक असा राहणार आहे.