Pune-Hubali Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे सातत्याने विस्तारत आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी अवघ्या पाच वर्षांच्या काळात संपूर्ण देशभरात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात 55 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत्या. मात्र 15 आणि 16 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
यामुळे आता ही संख्या 65 वर पोहोचली आहे. महाराष्ट्राला देखील तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. राज्यात आधी आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत्या. आता ही संख्या अकरा एवढी झाली आहे.
राज्याला नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या तीन गाड्या मिळाल्या आहेत. दरम्यान आज आपण पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर या गाडीचे उद्घाटन काल अर्थात 16 सप्टेंबरला झाले आहे. मात्र ही गाडी सर्वसामान्यांसाठी 18 सप्टेंबर पासून धावणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि तिकीटदरासंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.
कसे आहे वेळापत्रक ?
ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालवली जाणार आहे. ही गाडी पुणे स्टेशनवरून प्रत्येक गुरूवार, शनिवार आणि सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजता सोडले जाणार आहे आणि त्याच दिवशी ही गाडी रात्री पाऊणे अकरा वाजता हुबळीला पोहोचणार आहे. तसेच हुबळी स्टेशन वरून ही गाडी बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे पाच वाजता सोडली जाणार आहे आणि दुपारी दीड वाजता ही गाडी पुण्याला पोहोचणार आहे.
कुठं राहणार थांबा ?
पुण्याहून निघाल्यानंतर ही वंदे भारत ट्रेन सातारा, सांगली, मिरज, बेळगाव आणि धारवाड या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
तिकीट दर कसे राहणार ?
एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये पुणे ते हुबळी हा संपूर्ण प्रवास करायचा असेल तर जेवणासह 2,780 रुपये अन जेवणाशिवाय 2,385 रुपये मोजावे लागतील. पुणे ते धारवाड जेवणासोबत 2,725 आणि जेवणाशिवाय 2,325 रुपये, पुणे ते बेळगाव जेवणासोबत 2,290 आणि जेवणाशिवाय 1,890 रुपये आणि पुणे ते सांगली जेवणासोबत 1,690 अन जेवणाशिवाय 1430 रुपये मोजावे लागतील.
चेअरकार कोचंमध्ये प्रवास करायचा असेल तर पुणे ते हुबळी या संपूर्ण प्रवासासाठी जेवणासह 1,530 रुपये आणि जेवणाशिवाय 1,185 रुपये मोजावे लागणार आहेत.
तसेच, पुणे ते धारवाड जेवणासह 1,505 अन जेवणाशिवाय 1,160 रुपये, पुणे ते बेळगाव जेवणासह 1,295 आणि जेवणाशिवाय 955 रुपये आणि पुणे ते सांगली जेवणासह 965 आणि जेवणाशिवाय 730 रुपये मोजावे लागणार अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.