Pune-Hubali Vande Bharat Express : पुण्यासहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना ऐन गणेशोत्सवाच्या काळात एक मोठी गुड न्यूज मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यासहित पश्चिम महाराष्ट्राला आता वंदे भारत एक्सप्रेस ची भेट दिली जाणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला लवकरच हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंधरा तारखेला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार असून यामध्ये पुणे ते हुबळी दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस चा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण पुणे ते हुबळी दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असेल रूट अन वेळापत्रक ?
ही गाडी पुण्याहून सातारा-सांगली-मिरज-बेळगांव-धारवाड मार्गे हुबळीला रवाना होणार आहे. पुणे ते हुबळी या 588 किलोमीटर अंतरासाठी ही गाडी सुरू होणार आहे. ही गाडी सोमवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावणार आहे.
8 कोचं असणारी ही गाडी पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी लाभदायी ठरणार आहे. या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी पुण्यातून दुपारी सव्वादोन वाजता सुटणार आहे.
मग पुढे सातारा, सांगली, मिरज, बेळगाव असे करत हुबळी येथे पाऊणे अकरा वाजता पोहोचणार आहे. हुबळीतून ही गाडी पहाटे पाच वाजता सोडली जाणार आहे आणि पुण्याला दीड वाजता पोहोचणार आहे.
कुठे थांबणार ही गाडी ?
या गाडीला या रेल्वे मार्गावरील सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. या गाडीला पुणे ते हुबळी असा 588 किलोमीटर लांबीचा प्रवास करण्यासाठी साडेआठ तासांचा कालावधी खर्च करावा लागणार असा दावा केला जातोय.