Pune Metro News : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या कॉमन बनली आहे. पुणे शहर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवते. यामुळे या शहराला सांस्कृतिक राजधानीचा दर्जा मिळाला आहे. मात्र अलीकडे हे सांस्कृतिक राजधानीचे शहर, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब ट्रॅफिक जामच्या समस्येमुळे बेजार झाले आहे. पुणेकरांना ट्रॅफिक जामचा मोठा फटका बसत आहे.
हेच कारण आहे की पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहेत. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग कार्यान्वित आहेत. यातील एक मार्ग अंशतः खुला झाला आहे तर दुसरा मार्ग पूर्णपणे खुला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट म्हणजे पर्पल मेट्रो लाईनचा पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. तसेच वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
यातील सिविल कोर्ट ते स्वारगेट या पर्पल मेट्रो लाईनचा बाकी राहिलेल्या मार्गाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे लवकरच हा मार्ग आता वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सुरुवातीला, सिविल कोर्ट ते स्वारगेट पर्यंतची मेट्रो सेवा ऑगस्ट 2024 पर्यंत जनतेसाठी सुरू केली जाणार असा दावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर महा मेट्रो ने खूप प्रयत्न केले होते. पण, तांत्रिक अडचणींमुळे या मार्गाचे काम लांबणीवर पडले.
यामुळे महा मेट्रो ने ठरवलेल्या वेळेत हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकला नाही. पण, आता बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू असून येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असा अहवाल अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
यामुळे पुढील महिन्यात हा प्रकल्प वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो असा दावा आता मीडिया रिपोर्ट मध्ये केला जाऊ लागला आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत हा प्रकल्प वाहतूक सेवेत येणार असा अंदाज आहे.
महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाच्या खूपच जवळ आले आहे, म्हणून महा मेट्रोने मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याशी संपर्क साधला आहे.
तीन स्थानकांसह संपूर्ण भागासाठी सुरक्षा तपासणीची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हा मार्ग सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
गणेशोत्सवाच्या अखेरीस हा मार्ग वाहतुकीच्या सेवेत दाखल होऊ शकतो अशी आशा आता प्रवाशांना आहे. यामुळे पुढल्या महिन्यात सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.