स्पेशल

पुणे मेट्रो वेळापत्रक : पुण्यात अश्या धावतात मेट्रो जाणून घ्या मार्ग आणि संपूर्ण टाइमटेबल…

Pune Metro Timetable : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब म्हणून नावारूपाला आलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जटील बनली आहे. पुण्याप्रमाणेच मुंबई आणि नागपूर मध्येही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर मध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मेट्रोचा प्रकल्प हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे मेट्रोबाबत बोलायचं झालं तर पुणे मेट्रोचा प्रकल्प 2016 मध्ये हाती घेण्यात आला. पुणे मेट्रो प्रकल्प फेज-1 चे काम 2016 मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळात सुरू झाले. या अंतर्गत 33.1 किमीचा मेट्रो कॉरिडॉर विकसित केला जात आहे.

हा मेट्रोचा फेज 1 दोन लाईनमध्ये विभागलेला आहे. लाईन 1 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट दरम्यान 17.4 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे, यावर 14 स्थानके आहेत. लाईन 2 मध्ये 16 स्थानके आहेत आणि हा मार्ग वनाझ ते रामवाडीपर्यंत आहे, याची 15.7 किमी आहे. हे दोन्ही मार्ग महा मेट्रो विकसित केले आहेत. याशिवाय, पुणे मेट्रो लाइन 3 क्वाड्रॉन ते दिवाणी न्यायालयापर्यंत असून याची लांबी 23.3 किमी एवढी आहे.

हा मार्ग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विकसित होत आहे. सध्या पुण्यात मेट्रो लाईन 1 आणि मेट्रो लाईन 2 हे प्रकल्प वाहतुकीसाठी सुरू आहेत. मेट्रो लाईन एक मधील पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा एलिव्हेटेड मार्ग वाहतुकीसाठी सुरू असून सिविल कोर्ट ते स्वारगेट या दरम्यानचा भूमिगत मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. हे काम येत्या काही महिन्यांनी पूर्ण होईल आणि प्रत्यक्षात हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मेट्रो लाईन 2 चे वनाझ ते रामवाडी हा 15.7km लांबीचा मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल झाला आहे.

कधी सुरू झाली वाहतूक ?

6 मार्च 2022 ला लाईन एक मधील पिंपरी चिंचवड महापालिका ते फुगेवाडी अन लाईन दोन मधील वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर एक ऑगस्ट 2023 ला फुगेवाडी ते सिविल कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक हा मार्ग सुरु झाला. यानंतर सहा मार्च 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या टप्प्याचे लोकार्पण केले. पण मेट्रो लाईन एकचे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम अजूनही सुरूचं आहे. येत्या काही दिवसांनी हे कामही पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

दोन्ही मेट्रो मार्गावरील स्थानके

मेट्रो लाईन 1 ज्याला पर्पल लाईन म्हणून ओळखले जाते. या मार्गावर एकूण 14 स्थानके आहेत. यातील पीसीएमसी ते सिविल कोर्ट असा 11.4 किलोमीटरचा मार्ग उन्नत आहे आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा सहा किलोमीटरचा मार्ग भूमिगत आहे. या मार्गावर पीसीएमसी, संत तुकाराम, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बापोडी, खडकी, रेंज हिल, शिवाजीनगर, सिविल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट ही स्थानके आहेत. या मार्गावर रेंज हिल येथे डेपो आहे. या मेट्रो लाईन एकच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे सध्या काम सुरू आहे आणि उर्वरित मार्ग हवाहतुकीसाठी सुरू आहे.

मेट्रो लाईन 2 ज्याला एक्वा लाईन असे संबोधले जाते. हा एक्वा लाईन मार्ग 15.7 किलोमीटर लांबीचा आहे आणि यावर 16 स्थानके आहेत. हा संपूर्ण मार्ग उन्नत आहे. वनाज, आनंदनगर, आयडियल नगर, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, पीएमसी, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिक, बंडगार्डन, येरवडा, कल्याणी नगर, रामवाडी ही स्थानके आहेत. या मार्गावर हिल व्युव्ह कार पार्क येथे डेपो आहे. हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे. 

कशी आहे मेट्रो लाईन 3

मेट्रो लाईन 3 ला रेड लाईन म्हणून ओळखले जात आहे. हा मार्ग हिंजवडी या आयटी हबला शहराच्या मध्यवर्ती भागासोबत म्हणजेच शिवाजीनगरशी जोडतो. मेगा पोलीस ते सिविल कोर्ट या दरम्यान हा मार्ग विकसित होत आहे. या मार्गाचे काम दोन फेजमध्ये होणार आहे. पहिल्या फेजमध्ये हिंजवडी आणि बालेवाडी तसेच दुसऱ्या फेजमध्ये बालेवाडी आणि सिविल कोर्ट शिवाजीनगर यादरम्यान मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. हा मार्ग मार्च 2025 पर्यंत वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

या प्रकल्पासाठी 8313 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर मेगापोलिस सर्कल, दूतावास क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज II, विप्रो फेज II, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, NICMAR, राम नगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा,  बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसाधन, सकाळ नगर, विद्यापीठ,  R.B.I.,  कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय ही स्थानके विकसित केली जाणार आहेत. अजून हा मार्ग वाहतुकीसाठी दाखल झालेला नाही.

वेळापत्रक कसे आहे ?

मेट्रो लाईन 1 म्हणजेच पर्पल लाईनवर सकाळी सहा पासून ते रात्री दहापर्यंत मेट्रो धावत आहे. या मार्गावर सकाळी सहा ते आठ, 11 ते दुपारी 4, सायंकाळी आठ ते दहा या कालावधीत प्रत्येक दहा मिनिटांनी आणि सकाळी आठ ते 11, सायंकाळी  चार ते आठ या कालावधीत प्रत्येक साडेसात मिनिटांनी मेट्रो चालवली जात आहे. मेट्रो लाईन 2 म्हणजेच एक्वा लाईन वर सकाळी सहा पासून ते रात्री दहापर्यंत मेट्रो चालवली जात आहे. या मार्गावर सुद्धा सकाळी सहा ते आठ, 11 ते दुपारी 4, सायंकाळी आठ ते दहा या कालावधीत प्रत्येक दहा मिनिटांनी आणि सकाळी आठ ते 11, सायंकाळी  चार ते आठ या कालावधीत प्रत्येक साडेसात मिनिटांनी मेट्रो चालवली जात आहे.

मेट्रो लाईन 1 आणि मेट्रो लाईन 2 चा विस्तार होणार

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्ग 2 चा विस्तार देखील प्रस्तावित आहे. या विस्तारीकरणाअंतर्गत वनाज ते चांदणी चौक असा 1.12 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होणार आहे. यावर कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक असे दोन स्थानके राहणार आहेत. तसेच रामवाडी ते वाघोली असा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. हा 11.63 किलोमीटर लांबीचा मार्ग राहणार असून यावर 11 स्थानके तयार केली जाणार आहेत. यात विमान नगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबळे नगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर टेम्पल, वाघोली, सिद्धार्थ नगर, बाकोरी फाटा आणि विठ्ठलवाडी ही स्थानके समाविष्ट आहेत.

तसेच नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाच्या उद्घाटन समारंभात पिंपरी ते निगडी या ४.४ किमीच्या मार्गाचे व्हर्च्युअल भूमिपूजन सुद्धा करण्यात आले आहे. ज्यामुळे पुणे मेट्रो नेटवर्कचा विस्तार आणखी वाढणार आहे. या नवीन मार्गामुळे दररोज किमान 15,000 प्रवासी वाढण्याची अपेक्षा असताना, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी आणि कार्यालयात जाणाऱ्यांसाठी प्रवासातील आव्हाने कमी करण्यासाठीही हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts