Pune Metro News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीची समस्या कॉमन बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. दरम्यान या महानगरांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या महानगरांमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली आहे.
पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्यात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे शहरातील मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता पुणे मेट्रो संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा मेट्रो मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे.
या मेट्रो मार्गाचा बाकी राहिलेला टप्पा म्हणजेच सिविल कोर्ट ते स्वारगेट हा पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग येत्या काही दिवसांनी वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. तसेच वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग देखील वाहतुकीसाठी सुरू आहे.
विशेष म्हणजे वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचा आता विस्तार देखील केला जाणार आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली ( विठ्ठलवाडी ) असा या मार्गाचा विस्तार करणे प्रस्तावित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विस्ताराला महाराष्ट्र राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे.
यासाठी 3756 कोटी आणि 58 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्य सरकार आणि भांडवली बाजारातून यासाठी कर्ज उभारले जाणार आहे. ही योजना मेट्रो रेल कॉर्पोरेशनने म्हणजे महा-मेट्रोने आखली आहे. आता याच मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये केंद्र शासनाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची म्हणजेच पी आय बी या संस्थेची महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे. दरम्यान या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.
या बैठकीत या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन होणार असून या प्रकल्पाला अंतिम स्वरूप मिळणार आहे. यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या या बैठकीकडे तमाम पुणेकरांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आता आपण पुणे शहरात तयार होणारे हे प्रस्तावित विस्तारित मेट्रो मार्ग कसे राहणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा असणार विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्प?
वनाज ते चांदनी चौक हा 1.12 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग राहणार आहे. या मार्गावर कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक हे दोन स्टेशन राहणार आहेत. तसेच रामवाडी ते वाघोली हा 11.36 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे.
या मार्गावर एकूण 11 स्टेशन विकसित केली जाणार आहेत. विमान नगर, खराड़ी बायपास, वाघोली या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांना मार्च 2024 मध्ये राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. तसेच या प्रकल्पातील स्थानकाच्या बांधकामासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी 7 ऑगस्टला निविदा देखील काढल्या गेल्या आहेत.
दरम्यान, आता या विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. केंद्राकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात या दोन्ही प्रकल्पांच्या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे आता पुणेकरांसहित संपूर्ण महाराष्ट्राचे पुढील महिन्यात होणाऱ्या केंद्राच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाच्या मीटिंग कडे लक्ष लागून आहे.