Pune-Mumbai News : पुणे मुंबई महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक व्यस्त महामार्ग म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते. दरम्यान पुणे मुंबई महामार्गावर आता वाकड ते देहू रोड दरम्यान नवीन सर्विस रोड तयार होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्विस रोड साठी पुढाकार घेतला आहे.
येथील स्थानिकांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पाठपुरावाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी हा पुढाकार घेतला असून या ठिकाणी सर्विस रोड तयार झाला तर या भागातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असा विश्वास व्यक्त होतोय.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या कामाचा उल्लेख केला होता. दरम्यान जगताप यांच्या पाठपुराव्यानंतर आता वाकड ते देहूरोड दरम्यान नवा सर्विस रोड तयार होणार आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावर वाकड ते देहूरोड दरम्यान २४ मीटर रुंदीचे नवीन सर्व्हिस रोड तयार करण्याच्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली असल्याची बातमी समोर येत आहे. या मार्गावर दोन्ही बाजूचे सर्विस रोड तयार होणार आहेत.
दोन्ही बाजूंना प्रत्येकी 24 मीटर रुंदीचा सर्विस रोड विकसित होईल. हे सर्विस रोड पूर्ण झाल्यानंतर वाकड ते देहू रोड दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडी पासून नागरिकांची सुटका होणार आहे.
या कामा संदर्भात माहिती देताना आमदार जगताप यांनी निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. वाकड ते देहूरोड दरम्यान होणाऱ्या या प्रकल्पामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी कमी होतील आणि परिसराच्या विकासाला चालना मिळेल.
यासाठी नितीन गडकरी यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे, असं म्हणतं या प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.