Pune-Nashik Expressway : महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित केले जाणार आहे. यामध्ये पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाचा देखील समावेश होतो. या औद्योगिक महामार्ग प्रकल्पामुळे या पट्ट्यातील औद्योगिक विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
खरे तर पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्राची सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाचे शहरे. मात्र पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करायचा असेल तर सध्या स्थितीला प्रवाशांना पाच तासांचा वेळ खर्च करावा लागतोय. भविष्यात मात्र प्रवासाचा हा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे.
पुणे ते नाशिक प्रवास औद्योगिक महामार्गामुळे अवघ्या दोन ते अडीच तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. यामुळे या पट्ट्यातील कृषी, शिक्षण, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल असे म्हटले जात आहे.
दरम्यान या महामार्गासाठी आवश्यक असणाऱ्या पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतीच सुरू केली आहे. म्हणजे या महामार्गाचे काम अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
महामार्गासाठी एकूण 1546 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असून यापैकी 62.24 हेक्टर जमीन ही वनजमीन आहे. दरम्यान आता आपण हा महामार्ग प्रकल्प नेमका कसा आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा आहे पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग ?
हा 189.6 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. हा औद्योगिक महामार्ग अहमदनगरमधून जाणार आहे. म्हणजेच या मार्गामुळे अहमदनगर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यासाठी तब्बल 17 हजार 539 कोटीचा खर्च अपेक्षित आहे.
या महामार्गाचे तीन टप्पे आहेत. पुणे ते शिर्डी असा १३४ किलोमीटरचा पहिला टप्पा, शिर्डी इंटरचेंज ते निफाड इंटरचेंज असा ६० किमीचा मार्ग (चेन्नई-सुरत महामार्गाचा भाग) दुसरा टप्पा आणि चेन्नई-सुरत महामार्ग ते नाशिक असा निफाड राज्य महामार्गाचा १८ किलोमीटरचा तिसरा टप्पा असे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत.
या प्रोजेक्ट अंतर्गत 37 किलोमीटर लांबीचे जोड रस्ते म्हणजेच कनेक्टर तयार केले जाणार आहेत. याचा मुख्य रस्ता हा 54 गावांमधून आणि कनेक्टर म्हणजेच जोड रस्ता हा 29 गावांमधून जाणार आहे. या मार्गावर ११ बोगदे प्रस्तावित आहेत.
तसेच ७ मुख्य पूल आणि ६० वायडक्टही प्रस्तावित करण्यात आले आहेत. हा मार्ग राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर अशा महत्त्वाच्या शहरांमधून जाणार आहे.
या महामार्ग प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास अवघ्या दोन ते अडीच तासात पूर्ण होऊ शकतो असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळ करत आहे. अर्थातच नजीकच्या भविष्यात पुणे ते नाशिक हा प्रवास जलद होणार आहे.