Pune New Bus Service : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे पेट्रोल डिझेलचा वापर कमी होत आहे यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येणे शक्य होत आहे. म्हणून सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात देखील आता इलेक्ट्रिक बसेस आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांच्या काळात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध विभागांमध्ये इलेक्ट्रॉनिक गाड्या दाखल झाल्या आहेत.
यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा विभागाला देखील इलेक्ट्रिक गाड्या मिळाव्यात अशी मागणी होती. प्रवाशांकडूनही सातारा विभागाला इलेक्ट्रिक गाड्या मिळायला हव्यात अशी इच्छा व्यक्त केली जात होती.
दरम्यान, एसटीच्या सातारा विभागाला आता इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात सातारा विभागाला पाच नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच नवीन इलेक्ट्रिक बसेस सातारा विभागाला मिळणार आहेत.
म्हणजेच सातारा विभागाला एकूण दहा इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून सातारा विभागाला ज्या इलेक्ट्रिक बसेसची आतुरता होती ती आता पूर्ण झाली आहे.
या इलेक्ट्रिक बसेस आता स्वारगेट ते सातारा यादरम्यान सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या सातारा विभागाला 5 बसेस मिळाल्या असल्याने या गाडीच्या सातारा ते स्वारगेट यादरम्यान 12 फेऱ्या होत आहेत.
पण, आगामी काळात आणखी पाच इलेक्ट्रिक गाड्या सातारा विभागाला मिळणार आहेत अन तेव्हा सातारा ते स्वारगेट या मार्गावर सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसच्या 24 फेऱ्या होणार आहेत.
सातारा ते स्वारगेट या मार्गावर सुरू असणाऱ्या इलेक्ट्रिक बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 245 रुपये आणि स्वारगेट ते सातारा असा प्रवास करणाऱ्यांकडून 230 रुपये एवढे तिकीट आकारले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे या इलेक्ट्रिक बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महामंडळाच्या माध्यमातून लागू असणाऱ्या सर्व सवलती लागू केल्या गेल्या आहेत.
फक्त विद्यार्थ्यांना पासेस सोडून सर्व सवलती सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही समोर आलीये. मात्र या गाड्या विना थांबा धावत आहेत. म्हणजेच स्वारगेट ते सातारा दरम्यान ही गाडी कुठेच थांबत नाही.