Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे. श्रावण महिना सुरू झाला की भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत असतो. तसेच, येत्या काही दिवसांनी गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे.
यानंतर मग, नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दरम्यान या दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढणार आहे.
दरवर्षी दसरा, दिवाळीच्या कालावधीत रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असते. हीच संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते नागपूरदरम्यान विशेष एसी सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष द्वि साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेनच्या आठ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, आता याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या 8 ऐवजी 14 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
यामुळे दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे नवीन वेळापत्रक कसे राहणार आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसे असेल नवीन टाईम टेबल
मध्य रेल्वेने 28 ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या काळात पुणे ते नागपूर दरम्यान द्विसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वेने या काळात या द्वि साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या पुणे ते नागपूर अशा चार आणि नागपूर ते पुणे अशा चार म्हणजेचं या गाडीच्या एकूण 8 फेऱ्या होतील असे जाहीर केले होते.
पण आता यामध्ये बदल करण्यात आला असून 21 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या काळात ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. या काळात पुणे ते नागपूर अशा सात आणि नागपूर ते पुणे अशा सात म्हणजेच या गाडीच्या एकूण 14 फेऱ्या होणार आहेत.
या काळात नागपूर-पुणे विशेष एसी सुपरफास्ट ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकावरून प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी रात्री 7:40 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 वाजता पुण्याला पोहोचणार आहे.
तसेच पुणे-नागपूर विशेष सुपरफास्ट गाडी दर मंगळवारी आणि शनिवारी दुपारी 3:50 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर येणार आहे.