Pune Ring Road Big Change : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. खरे तर शहरात दोन नवीन रिंग रोड तयार होणार आहेत. यातील एक रिंग रोड हा राज्य रस्ते विकास महामंडळ आणि दुसरा रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए कडून विकसित होणार आहेत. दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित होणाऱ्या रिंग रोड प्रकल्पाचे काम गेल्या काही महिन्यांपासून युद्ध पातळीवर सुरू आहे.
यासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास शेवटच्या टप्प्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात विभागला गेला आहे. यातील पश्चिम टप्प्यातील रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले असून पूर्व भागातील रिंग रोडचे काम देखील जोमात सुरु आहे. पुणे रिंग रोड हा 172 किलोमीटर लांबीचा प्रकल्प. या रस्त्याची रुंदी ही 110 मीटर एवढी आहे.
मात्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा पूर्व भागातील रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेल्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा हरित महामार्ग काही ठिकाणी एकत्र येतो. त्यामुळे पुणे रिंग रोड प्रकल्पाचा जवळपास 31 किलोमीटर लांबीचा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधावा असा निर्णय याआधी घेण्यात आला होता.
यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने हा 31 किलोमीटर लांबीचा भाग वगळून उर्वरित रिंग रोड प्रकल्पासाठी टेंडर मागवले होते. इच्छुक कंपन्यांनी टेंडर सादरही केलेत आणि या टेंडरची पुढील प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. पण अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी या 31 किलोमीटर लांबीच्या रिंग रोड संदर्भात एक मोठा बदल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या 31 किलोमीटर लांबीचे काम आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणऐवजी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जाणार आहे. या 31 किलोमीटरच्या रस्त्याचे काम तीन टप्प्यात होणार असून यासाठी टेंडर मागवण्यात आले आहे. ज्या कंपन्यांना या 31 किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी टेंडर भरायचे असेल त्यांना सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्या पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
आधी पूर्व आणि पश्चिम भागातील रिंग रोडच्या नऊ टप्प्यातील कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. आता तीन टप्प्यातील कामांसाठी निविदा मागवल्या जात आहेत. म्हणजेच पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम आता एकूण 12 टप्प्यात पूर्ण होणार आहे. परंतु याआधी सादर झालेले टेंडर अंदाजीत किमतीपेक्षा 40 ते 45 टक्के अधिक आहेत.
यामुळे टेंडर प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अशातच आता रिंग रोड प्रकल्पाचे उर्वरित 31 km लांबीचे काम देखील राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जाणार असून यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली असल्याची बातमी समोर येत आहे. तथापि महामंडळाच्या या निर्णयामुळे पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
कारण की पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रस्तावित असणाऱ्या हरित महामार्ग संदर्भात अजून कोणतीच डेव्हलपमेंट झालेली नाही. या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अलीकडे स्थापित झालेल्या एम एस आय डी सी कडे सोपविण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे याच्या अलाइनमेंट मध्ये बदल करण्याची देखील बातमी मध्यंतरी समोर आली होती. तसेच सध्याचा पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा चार पदरी महामार्ग नूतनीकरण केला जाईल आणि त्यानंतर मग नवीन हरित महामार्गाचे काम सुरू केले जाईल असेही काही प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहे.
एकंदरीत पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या हरित महामार्गाचे काम आता लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर पुणे रिंग रोडच्या 31 किलोमीटर लांबीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले गेले तर हे काम लवकर होणार असे बोलले जात आहे.