Pune – Sambhajinagar Expressway : गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहित देशात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. यामुळे शहरा शहरांमधील अंतर कमी झाले आहे. रस्ते कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत नक्कीच सक्षम झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अजूनही देशात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.
अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी एक अतिशय महत्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होणार आहे.
पालखी महामार्गसमवेत विविध रस्त्यांची कामे अन नद्यांवरील पुलांची जवळपास दीड हजार कोटी रुपयांची कामे डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
यासोबतच गडकरी यांनी पुणे रिंग रोड प्रकल्प, एलिव्हेटेड रोड, मुंबई-बेंगलोर, नाशिक रस्ता, पुणे छत्रपती संभाजी नगर रस्ता या कामांच्या निविदा प्रक्रिया सुद्धा अंतिम झाल्या असल्याची माहिती दिली आहे.
पुणे ते छत्रपती संभाजी नगर प्रवास आता अवघ्या दोन तासात
गडकरी यांनी सांगितलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी वाचणार आहे. यामुळे शहरा शहरांमधील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे. रेल्वे प्रमाणेच रस्ते मार्गाने देखील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
नवनवीन महामार्ग प्रकल्पांमुळे आणि रस्त्यांच्या कामांमुळे कृषी, शिक्षण, उद्योग, पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या फायदा पोहोचत आहे. कोणत्याही क्षेत्रात रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांची फार मोठी गरज असते.
कोणत्याच क्षेत्राचा विकास हा रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधाविना होऊ शकत नाही. यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात रस्त्यांच्या कामांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
दरम्यान आता केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तसेच मुंबई बेंगलोर सहा तास, पुणे बेंगलोर साडेचार तास आणि पुणे ते नाशिक हा प्रवास अवघ्या अडीच तासात पूर्ण होणार असा दावा दस्तूर खुद्द गडकरी यांच्या माध्यमातून केला जात आहे.