Pune Shirdi And Solapur Railway News : मध्य रेल्वेच्या माध्यमातून सणासुदीच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता मध्य रेल्वेने याच विशेष गाड्यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
या विशेष गाड्यांमध्ये अजूनही प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने , या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने मध्य रेल्वेने काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.
मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी आणि हडपसर येथून सोडल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली आहे. साईनगर शिर्डी ते बिकानेर आणि हडपसर ते हिसार दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे.
याबाबतचे परिपत्रक सुद्धा मध्य रेल्वे कडून नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि पुण्यातील हडपसर येथील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. खरेतर, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण शिर्डीला येतात.
देशातील कानाकोपऱ्यातील भाविक शिर्डी येथे हजेरी लावत असतात. अशा परिस्थितीत मध्य रेल्वेचा हा निर्णय शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी देखील फायद्याचा राहणार आहे. आता आपण मध्य रेल्वेचा हा सविस्तर निर्णय नेमका काय आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ झाली
मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी-बिकानेर-साईनगर शिर्डी विशेष गाडीच्या चार फेऱ्या वाढवल्या आहेत. गाडी क्र. 04716 शिर्डी-बिकानेर ही दि. २२ आणि २९ डिसेंबरला धावणार आहे.
तर गाडी क्र. 04715 बिकानेर-शिर्डी ही दि. २१ आणि २८ डिसेंबरला धावणार आहे. म्हणजेच या विशेष गाडीच्या शिर्डी बिकानेर अशा दोन आणि बिकानेर शिर्डी अशा दोन फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
या सोबतच हडपसर हिस्सार-हडपसर विशेष गाडीच्या चार फेऱ्या वाढविण्यात आल्या असून, गाडी क्र. 04724 हडपसर-हिसार ही दि. २३ आणि ३० डिसेंबरला धावणार आहे.
तर गाडी क्र. 04723 हिसार-हडपसर ही दि. २२ आणि २९ डिसेंबरला सुद्धा धावणार आहे. म्हणजे हडपसर हिसार अशा दोन फेऱ्या आणि हिसार हडपसर अशा दोन फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.