Pune Successful Farmer : पुणे हा पश्चिम महाराष्ट्रातील बागायती जिल्हा आहे. येथील शेतकरी बागायती पिकांची शेती मोठ्या प्रमाणात करतात. जिल्ह्यातील इंदापूर तालुका तर ऊस उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण ऊस या नगदी पिकावर अवलंबून आहे. परंतु काळाच्या ओघात आता ऊस शेतीला फाटा दिला जात आहे.
कारखान्यांकडून वेळेवर पेमेंट न होणे, अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणे, ऊसतोड मजूर तसेच वाहतूकदार यांच्याकडून होणारी पिळवणूक, वेळेवर ऊस तोडणी न झाल्यामुळे ऊसाला तुरे फुटणे आणि साखर उतारा कमी होणे यांसारख्या एक ना अनेक समस्येमुळे इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पर्यायी पिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
अशा परिस्थितीत आता परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांनी ऊसाला फाटा देत फळबाग पिकांची लागवड सुरू केली आहे. माळेवाडी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील ऊस पिकाला फाटा देत पेरूच्या लागवडीतून मात्र अर्धा एकर शेत जमिनीत 12 लाखांची कमाई काढली आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची परिसरात चर्चा पहावयास मिळत आहे. बाळासो केशव बनसुडे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.
बनसुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या 20 गुंठे पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत पेरूची लागवड केली. लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्व मशागत योग्य पद्धतीने करण्यात आली, मशागतीनंतर पिंक तैवान या जातीच्या 300 रोपांची लागवड झाली. वीस रुपये प्रमाणे रोपांची खरेदी त्यांनी केली होती. म्हणजेच रोपांसाठी जवळपास 6000 रुपयाचा खर्च त्यांना आला. तसेच मशागतीसाठी सहा हजाराचा खर्च आणि शेणखत, कोंबड खत, निंबोळी खत यासाठी 25 ते 30 हजाराचा खर्च त्यांनी केला.
विशेष म्हणजे पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. यासाठीही त्यांना जवळपास 30000 चा खर्च आला आहे. लागवडीनंतर साधारणता एका वर्षांनी यापासून उत्पादन मिळतं. ज्यावेळी पेरू बागेत फळधारणा होते त्यावेळी झाडांना आधार द्यावा लागतो. म्हणजेच स्टेकिंग करावी लागते, यासाठी बांबू तारा पोल याचा उपयोग केला जातो. यासाठी त्यांना तीस हजाराचा खर्च आला आहे.
याशिवाय त्यांनी संपूर्ण आधुनिक पद्धतीने पेरूची शेती केली असून पेरूच्या फळाला फम आणि प्लास्टिक पिशवी लावली असून यासाठी एकरी 80 हजाराचा खर्च म्हणजे त्यांना जवळपास 40 हजार रुपयांचा खर्च आला आहे. एकंदरीत या वीस गुंठे शेत जमिनीसाठी त्यांना तीन लाखांचा उत्पादन खर्च आला आहे. पण यातून त्यांना तब्बल 12 लाख रुपयांची कमाई झाली असून खर्च वजा करता नऊ लाख रुपये निव्वळ नफा त्यांना राहिला आहे.
खरं पाहता इंदापूर तालुका व आजूबाजूचा परिसर ऊस लागवड आणि डाळिंब शेतीसाठी संपूर्ण राज्यात ओळखला जात होता. मात्र डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आणि परिसरातील डाळिंब बागा नामशेष झाल्या आहेत. शिवाय ऊस उत्पादन करण्यासाठी देखील वेगवेगळे अडथळे शेतकऱ्यांच्या पुढ्यात आहेत. यामुळे ऊसाला देखील फाटा दिला जात आहे.
आता परिसरात मोठ्या प्रमाणात पेरू व इतर फळबाग पिकांची लागवड पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बनसोडे यांनी देखील पेरू लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करत मार्गदर्शक असं काम केलं आहे. निश्चितच आधुनिक पद्धतीने शेती केली तर कमी जमिनीतूनही लाखोंची कमाई होऊ शकते हेच बनसोडे यांनी दाखवून दिले आहे.