Rabi Harbhara Lagwad : खरीप हंगामाची लवकरच सांगता होणार आहे. खरीप नंतर रब्बी हंगामाची सुरुवात होईल. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट होते. यंदा मात्र मानसून काळात खूपच चांगला पाऊस झाला असून आणखी काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती नाहीये. यामुळे यंदा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी होणार आहे.
गहू, हरभरा या मुख्य पिकांचे लागवडीखालील क्षेत्र यंदा किंचित सुधारेल असे म्हटले जात आहे. दरम्यान, जर तुम्हीही यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण हरभऱ्याच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया हरभऱ्याच्या प्रमुख जाती.
हरभऱ्याच्या प्रमुख जाती खालील प्रमाणे
कृपा : हरभऱ्याची ही एक सुधारित जात आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामान या जातीच्या लागवडीसाठी विशेष अनुकूल असल्याचे आढळून आले आहे. उत्तर महाराष्ट्र सहित मध्य महाराष्ट्रातील हवामान देखील या जातीला विशेष मानवते.
हरभऱ्याची ही सुधारित जात संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यात देखील या जातीची लागवड करता येणे शक्य आहे. बागायती भागात या जातीची लागवड केल्यास अधिक चे उत्पादन मिळते.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पेरणीनंतर साधारणतः 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. या जातीपासून सरासरी 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.
तथापि प्रायोगिक तत्त्वावर या जातीपासून बागायती भागांमधून 30 ते 32 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवण्यात आले आहे. हा एक काबुली हरभऱ्याचा वाण आहे. सफेद रंगाचे टपोरे दाणे असणारे हा वाण शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असून या जातीच्या हरभऱ्याला बाजारात चांगला दर मिळत आहे.
विराट : हरभऱ्याचा हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आला आहे. राज्यातील अनेक हरभरा उत्पादक जिल्ह्यांमध्ये याची लागवड पाहायला मिळत आहे. 110 ते 115 दिवसात या जातीचे पीक परीपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.
जिरायती आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये याची लागवड करता येणे शक्य आहे. जिरायती भागातून सरासरी 11 आणि बागायती भागातून सरासरी 19 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते. हा सुद्धा काबुली हरभरा आहे. या हरभऱ्याला सुद्धा बाजारात चांगला दर मिळतो.
दिग्विजय : जिरायती आणि बागायती अशा दोन्ही भागांमध्ये याची लागवड होऊ शकते. चिरायती भागात 90 ते 95 दिवसात आणि बागायती भागात 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक काढणीसाठी तयार होते. जिरायती भागात सरासरी 14 क्विंटल आणि बागायती भागात सरासरी 23 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. पिवळसर तांबूस रंगाचे दाणे असणारा हा हरभरा वाण शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात भरीव वाढ घडवून आणणार आहे.