Rabi Jowar Farming : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. खरिपातील जवळपास सर्वच पिकांची हार्वेस्टिंग येत्या काही दिवसांनी सुरु होणार आहे. सोयाबीन, कापूस, मका अशा विविध पिकांची हार्वेस्टिंग येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे. खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली की मग रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू होईल. अशा परिस्थितीत आज आम्ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
आज आम्ही रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांना ज्वारी पेरणी करायची असेल अशा शेतकऱ्यांसाठी ज्वारीच्या सुधारित जातींची माहिती देणार आहोत. वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी या संस्थेने विकसित केलेल्या ज्वारीच्या टॉप 4 सुधारित जातींची आज आपण माहिती पाहणार आहोत.
ज्वारीच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
परभणी मोती (एसपीव्ही-१४११) : मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेली ज्वारीची ही एक सुधारित जात आहे. या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा जवळपास 125 दिवसांचा आहे. या जातीपासून आठ ते नऊ क्विंटल धान्याचे उत्पादन आणि 15 क्विंटल कडव्याचे उत्पादन मिळते. या जातीचे दाणे टपोरे असतात. दाणे मोत्यासारखे चमकतात आणि भाकरीची प्रत देखील उत्तम असते. राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल आहे.
परभणी सुपर मोती (एसपीव्ही-२४०७) : ही देखील ज्वारीची एक सुधारित जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या जातीच्या ज्वारीची लागवड केली जाते. या जातीचे पीक 120 दिवसात परिपक्व होते आणि या जातीपासून 12 ते 13 क्विंटल धान्याचे उत्पादन मिळते. कडब्याचे उत्पादन देखील खूपच विक्रमी आहे.
ही जात खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास मध्यम सहनशील असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. ही जात मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये याची मोठ्या प्रमाणात शेती होत आहे.
परभणी शक्ती (पीव्हीके-१००९) : ज्वारीचा हा सुधारित वाण संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आला आहे. या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा सरासरी 118 दिवसांचा आहे. या जातीपासून 14 ते 15 क्विंटल धान्याचे उत्पादन मिळते. कडब्याचे उत्पादन देखील 45 ते 46 क्विंटल च्या दरम्यान असते.
राज्यात ज्या ठिकाणी ज्वारीचे उत्पादन होते तिथे या जातीची मोठ्या प्रमाणात पेरणी होत असल्याचे आढळून आले आहे.
परभणी ज्योती (सीएसव्ही-१८) : ज्वारीचा हा एक सुधारित प्रकार आहे. या जातीचे पीक हे सरासरी 125 ते 130 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.
या जातीपासून 15 ते 16 क्विंटल एवढे धान्याचे उत्पादन मिळते. या जातीचे पीक मावा किडीस प्रतिकारक असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. हा जमिनीवर न लोळणारा वाण असून बागायती भागासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.