स्पेशल

राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा मंत्रीपदी विराजमान ! 1986 ते 2024 कशी आहे ना. विखे पाटील यांची राजकीय कारकीर्द

Radhakrishna Vikhe Patil News : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला. 5 डिसेंबरला भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

फडणवीस यांच्या सोबतच शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. दरम्यान, सत्ता स्थापित झाल्यापासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार ? हा मोठा प्रश्न होता.

आज अखेर उपराजधानी नागपूर येथे महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न झाला आहे. यात महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विजयी झाले आहेत. ते जवळपास 38 वर्षापासून राजकारणात आहेत.

अर्थातच येत्या दोन वर्षात राजकारणातील त्यांचा अनुभव चार दशकांचा होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण अहिल्या नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना विखे पाटील घराण्याची देण
विखे पाटील घराणे हे अहिल्यानगर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं घराण आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारणात या घराण्याने आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे.

विखे पाटील कुटुंबाची तिसरी पिढी सध्या राजकारणात सक्रिय आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील हे नगर दक्षिणचे माजी खासदार आहेत. खरे तर आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झाला आणि हा कारखाना विखे पाटील यांच्या घराण्यामुळेच सुरू झाला.

दिवंगत विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकाराने आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगरमध्ये आला. दिवंगत विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील. अन बाळासाहेब विखे पाटील यांना राधाकृष्ण विखे पाटील, अशोक विखे आणि राजेंद्र विखे हे तीन मुलं. यापैकी राधाकृष्ण विखे पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत. तर अशोक विखे पाटील हे शैक्षणिक संस्थांवर लक्ष ठेवून आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द
साल 1986, राधाकृष्ण विखे पाटील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेत आणि तेथूनच खऱ्या अर्थाने राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. पुढे 1994 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली.

1994 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील विजयी झालेत आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी कधीच मागे वळून पाहिलेले नाही. 1994 पासून ते आमदार म्हणून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

खरे तर 1994 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर राधाकृष्ण विखे पाटील आमदार बनलेत. मात्र त्यांचे वडील, तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आणि शिवसेनेत गेलेत.

यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस मधून शिवसेनेत स्थलांतर केले. त्यानंतर 1995 ला पोटनिवडणूक झाली आणि त्यात ते शिवसेनेच्या तिकिटावरून निवडून आलेत. पुढे राधाकृष्ण विखे पाटील यांची घरवापसी झाली.

2014 साली महाराष्ट्रात भाजपा अन शिवसेनेचे सरकार आले, त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका निभावली. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्यामुळे काँग्रेस मधून भाजपा मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, त्यांनी भाजपच्या तिकीटवर खासदारकीची निवडणूक जिंकली. यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. अर्थातच 2019 पासून राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खा. डॉक्टर सुजय विखे पाटील हे भाजपामध्ये आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे मावळत्या शिंदे सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून कारभार पाहत होते.

राधाकृष्ण विखे पाटील आतापर्यंत कितीवेळा मंत्री राहिलेत?
राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1995 पासून ते आत्तापर्यंत विविध विभागाच्या मंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. ते 1995 ते 1999 दरम्यान कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राहिलेत. 2008 ते 2009 दरम्यान शालेय शिक्षण मंत्री राहिलेत.

2009 ते 2009 दरम्यान त्यांनी परिवहनमंत्री, बंदरे, विधी व न्यायविभागाचे मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला. 2010 ते 2014 दरम्यान ते कृषीमंत्री, अन्न व औषधनिर्माण विभाग, मराठी भाषा, इतर मागासवर्ग विभाग मंत्री म्हणून कारभार पाहत होते.

2014 ते 2019 दरम्यान त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका बजावली. 2019 ते 2019 दरम्यान त्यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून काम पाहिले. मावळत्या सरकारमध्ये म्हणजे 2022 ते 2024 मध्ये त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम पाहिले.

आता पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेल्यावेळी त्यांना महसूल खाते मिळाले होते, पण यंदा त्यांना कोणते खाते मिळते याबाबत नगरमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts