Radhakrishna Vikhe Patil News : आज सायंकाळी चार वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे 12 आमदार आज मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. विखे पाटील यांना नागपूर येथे शपथ घेण्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शनिवारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. दरम्यान, तिथेच फडणवीस यांनी विखेंना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले असल्याचे सांगितले जात आहे.
या भेटीतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखेंना नागपूरमध्ये शपथ घेण्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असून राधाकृष्ण विखे पाटील हे नागपूरला शपथ घेण्यासाठी रवाना देखील झाले आहेत.
देवाभाऊंकडून मंत्रिमंडळात समावेशाचे निश्चित झाल्यानंतर आणि शपथ घेण्याचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता इथं येत, श्रीक्षेत्र निझर्णीश्वराचे दर्शन घेतले.
तसेच लोणी बुद्रुक इथं ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवात सहभागी होत दर्शन घेतले. यात्रेनिमित्ताने काढण्यात आलेल्या काठीची विधीवत पूजा राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते झाली.
यानंतर मग साईदरबारी हजेरी लावत विखेंनी साईसमाधीचे दर्शन घेतले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर नागपूरकडे कूच केली आहे. खरे तर, मावळत्या शिंदे सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल मंत्री पदाची जबाबदारी होती. यामुळे आता फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना कोणते खाते मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केला फोन !
आज सकाळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदासाठी फोन केला असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विजयी झाले आहेत. शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असून ते पक्षातील एक ज्येष्ठ नेते आहेत.
यामुळे फडणवीस मंत्रिमंडळात देखील राधाकृष्ण विखे पाटील यांना स्थान मिळणार हे आधीपासूनच फिक्स होते. यानुसार आता राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही निमंत्रण दिल्याचे समजते.