Ram Shinde News : विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदे यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात येत आहे. विधान परिषद सभापतीपदी रामा भाऊंची वर्णी लागणार आहे. खरे तर राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाला.
ते सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेत. मात्र पराभवानंतरही भारतीय जनता पक्षाकडून त्यांना मोठी जबाबदारी मिळणार आहे. ते राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते आहेत. फडणवीस यांच्या विश्वासू नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.
म्हणून 2019 मध्ये जेव्हा ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तेव्हा त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेवर करण्यात आले. दरम्यान 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता प्रा. राम शिंदे यांना विधान परिषदेचे सभापती बनवण्यात येत आहे.
मागील २९ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधान परिषद सभापती पदी प्रा. राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विधान परिषद सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही, म्हणून ही निवड बिनविरोध होणार आहे.
विधान परिषदेचे सभापती पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने उपसभापती नीलम गोऱ्हे सभापती पदाची जबाबदारी पाहत होते. मात्र, आता विधान परिषदेचे सभापतीपदी भाजपचा उमेदवार बसणार आहे.
१९ डिसेंबर रोजी सभापतीपदाची निवडणूक होणार असून या निवडणूकीसाठी देवेंद्र फडणवीस यांचे अगदीच जवळचे अन विश्वासू नेते भाजपचे प्रा.राम शिंदे यांचे नाव महायुतीकडून उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्यपालांनी पाठविलेल्या कार्यक्रमानुसार बुधवारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे आवश्यक होते.
शिंदे यांनी सकाळी अर्ज दाखल केला आहे अन मविआने उमेदवार न देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे विधानपरिषद सभापतीपदाची निवड ही बिनविरोध होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेला असतानाही रामाभाऊंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.