Ram Shinde News : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागणार असल्याची बातमी हाती येत आहे. खरंतर, विधानसभा निवडणुकीत राम शिंदे कर्जत जामखेड मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र गेल्यावेळी प्रमाणेच याहीवेळी रामाभाऊंना पराभवाचा सामना करावा लागला.
मात्र, जेव्हा-जेव्हा रामाभाऊंचा पराभव होतो तेव्हा-तेव्हा पक्षाकडून त्यांना चांगली मोठी जबाबदारी सोपवली जाते आणि त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा रामाभाऊंचा पराभव झाला तेव्हा त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले आणि त्यांचे पुनर्वसन झाले.
विधान परिषदेवर गेल्यानंतर कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे यांची राजकीय ताकद फारच वाढली. 2024 च्या निवडणुकीत विधान परिषदेचे आमदार असतानाही त्यांना कर्जत जामखेडची उमेदवारी मिळाली. मात्र याहीवेळी रामाभाऊंना काही हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असतानाही रामाभाऊंना लॉटरी लागली आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदीच निकटवर्तीय नेत्यांमध्ये राम शिंदे यांची गणना होते आणि हेच कारण आहे की, विधानसभेच्या पराभवानंतर आता विधानपरिषद आमदार प्राध्यापक राम शिंदे यांना विधान परिषदेच्या सभापतीपदी बसवले जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
खरेतर, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यात आणि यामुळे विधानसभा अध्यक्षाची माळ ही पुन्हा एकदा भाजपाच्या गळ्यात पडली. दरम्यान भाजपा आता विधान परिषदेच्या सभापती पदासाठी देखील आग्रही असल्याचे समजते.
विधानसभा अध्यक्ष पद हे भाजपाने राहुल नार्वेकर यांना सोपवले आहे. यामुळे विधान परिषदेच्या सभापती पदी कोण बसणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. सध्या उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून अशातच विधान परिषदेच्या सभापतीची निवड केली जाणार असल्याचे समजते.
सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर, सभापती पद रिक्त आहे. पण, आता विधान परिषदेच्या सभापतींची लवकरच निवड होणार आहे. दरम्यान सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
विधानपरिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असून आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दरम्यान, उद्या सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.