Ram Shinde Vs Rohit Pawar : नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळालेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झालेत.
महायुतीचे देखील दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी काही विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांमध्ये मोठी ‘काटे की टक्कर’ झाली.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथेही माजी मंत्री राम शिंदे आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात फारच अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अगदीच शेवटच्या फेरीपर्यंत कोण विजयी होणार हे सांगता येत नव्हते.
काही राऊंड मध्ये रोहित पवार आघाडीवर होते तर काही राऊंडमध्ये विधान परिषदेचे आमदार रामाभाऊ आघाडीवर होते. अखेर शेवटच्या फेरीमध्ये रोहित पवार हे विजयी झालेत. रामाभाऊंचा अगदीच निसटता पराभव झाला.
यामुळे मात्र राम शिंदे हे मोठ्या प्रमाणात व्यथीत झाले. रामा भाऊंनी या निवडणुकीत भूमिपुत्र चळवळीच्या माध्यमातून मतदार संघात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता वाढली होती.
विधान परिषदेचे आमदार बनल्यानंतर रामाभाऊंची मतदार संघातील राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आणि याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. मात्र ते निवडणुकीत काही हजार मतांच्या फरकाने पडलेत.
दरम्यान आता विधानसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर रामाभाऊंनी आमदार रोहित पवार यांना एक ओपन चॅलेंज दिले आहे. त्यांनी रोहित पवारांना ‘पुन्हा नवा डाव मांडण्याचे’ आव्हान केले असून सध्या रामाभाऊंच्या या चॅलेंजेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा पाहायला मिळत आहे.
यावेळी रामाभाऊंनी असे म्हटले की, ‘मी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या आणि पुन्हा विधानसभेची निवडणूक होऊ द्या.’ यामुळे मतदार संघात रामा भाऊंच्या या वक्तव्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात सरकार स्थापन झाले तरी देखील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ अजूनही चर्चेत आहे आणि राम शिंदे यांनी पैसे भरून 14 मतदान केंद्रांमधील ईव्हीएम तपासणीची मागणीही केली आहे. यामुळे उलटसुलट चर्चा अद्यापही सुरूच आहे. त्यातच आता विधान परिषदेचे आ. राम शिंदे यांनी दिलेले हे आव्हान चर्चेचा विषय ठरत आहे.