Ratan Tata News : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे आज 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. यामुळे उद्योग जगतात शोककळा पसरली आहे. खरेतर, उद्योगपती रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरू होता.
उपचारासाठी त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावर माहिती देताना रतन टाटा यांनी त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे काहीही कारण नसून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले होते.
दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर आली. देशातील अनेक वृत्तसंस्थांनी रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी दिली. त्यांची प्रकृती खालावली असल्याने डॉक्टरांनी त्यांना आयसीयू मध्ये भरती केले होते. दरम्यान आज उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
सामाजिक कार्य आणि दानधर्मासाठी प्रसिद्ध असलेले रतन नवल टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक महान यश संपादन केले आहे आणि त्यांचे वर्णन शब्दात करणे कदाचित अशक्य आहे. ते केवळ एक यशस्वी व्यापारीच नव्हते तर ते एक तेजस्वी नेता, परोपकारी आणि लाखो लोकांसाठी आशेचे प्रतीक होते. यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर सध्या संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
राष्ट्र उभारणीतील अतुलनीय योगदानाबद्दल रतन नवल टाटा यांना दोन सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण मिळाले आहेत. टाटा समूहाला नव्या उंचीवर नेणारे रतन टाटा हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे उद्योगपती आहेत.
रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये सुप्रसिद्ध पारशी टाटा कुटुंबात झाला. त्यांचे वडील नवल टाटा आणि आई सुनी टाटा. लहान वयातच त्यांनी कौटुंबिक व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली होती. दरम्यान टाटा यांच्या निधनावर समाजकारण, राजकारण, शिक्षण उद्योगसहित सर्वच क्षेत्रातील लोकांच्या माध्यमातून शोक व्यक्त केला जात असून त्यांना भावपूर्ण आदरांजली दिली जात आहे.