समाजामध्ये आपण असे अनेक व्यावसायिक किंवा उद्योजक पाहतो की त्यांची सुरुवात अतिशय शून्यातून झालेली असते व पुढे चालून त्यांचा अखंड कष्ट आणि प्रचंड जिद्द असल्यामुळे ते खूप मोठी भरारी घेतात. अनेक क्षेत्रांमध्ये असे धडाडीचे काम करणारे व्यक्ती आपल्याला दिसून येतात व याला कृषीक्षेत्र देखील अपवाद नाहीत.
कृषी क्षेत्रामध्ये देखील आपल्याला असे अनेक दिग्गज व्यक्ती सापडतात की त्यांनी केलेली सुरुवात अगदी छोटीशी असते परंतु प्रचंड मेहनतीच्या जोरावर ते खूप मोठी प्रगती करतात. या अनुषंगाने या लेखात आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा बघणार आहोत की ज्याने शून्यातून सुरुवात केली व आज अथक परिश्रमातून फार मोठा फार्मर क्लब उभा केला आहे.
ज्ञानेश्वर बोडके यांचा खडतर असा यशस्वी प्रवास
पुणे जिल्ह्यातील माण हे आधुनिक असे गाव असून ते हिंजवडी आयटी पार्क जवळ असलेले एक सर्व सोयींनी युक्त असे गाव असून या ठिकाणी बोडकेवाडी नावाची एक छोटीशी वाडी आहे. या छोट्याशा गावामध्ये ज्ञानेश्वर बोडके यांनी अभिनव फार्मर क्लब नावाच्या संस्थेचे रोपटे लावले व आज या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. जर आपण ज्ञानेश्वर बोडके यांचा विचार केला तर शेती व्यवसायाची कास धरून व कष्ट घेऊन त्यामध्ये ते यशस्वी झाले.
जर शेतीमध्ये यशाचा प्रवास पाहिला तर ज्ञानेश्वर बोडके यांनी एका वर्तमानपत्रांमध्ये एका शेतकऱ्याची यशोगाथा वाचली व यशोगाथे मध्ये होते की आठवी शिक्षण झालेला शेतकऱ्याने दहा गुंठ्याच्या पॉलिहाऊस मध्ये बारा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. याच बातमीचा सकारात्मक परिणाम त्यांच्या मनावर झाला व त्यांनी लगेच सांगली या ठिकाणाच्या प्रकाश पाटील नावाच्या शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊस मधील शेतीची सगळी माहिती घेतली या पॉलिहाऊस मध्येच स्वतःचे करिअर करायचे असा चंग बांधला. या सगळ्या नंतर त्यांनी नोकरी सोडली व तळेगाव या ठिकाणी हॉर्टिकल्चर सेंटर मध्ये नियंत्रित शेती कशी केली जाते त्यासंबंधीचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.
प्रशिक्षण पूर्ण केले व त्याच हॉर्टिकल्चर सेंटरमध्ये पैसा न घेता काम केले. त्यानंतर याच प्रशिक्षणाचा फायदा त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये करायचा ठरवला. त्यानंतर स्वतःचे पॉलिहाऊस उभारण्याकरिता दहा लाख रुपयांची त्यांना गरज होती. मग त्यांनी बँकांचे हेलपाटे मारले परंतु त्यांना कर्ज मिळाले नाही त्यामुळे ते निराश झाले. परंतु तरी देखील त्यांनी कॅनरा बँकेच्या एका साहेबांना सगळा उपक्रम समजावून सांगितला व कॅनरा बँकेच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवले.
नंतर शेतामध्ये पॉलिहाऊस उभारले व ज्ञानेश्वर बोडके व त्यांच्या पत्नी पूजा यांनी सकाळी सात पासून या पॉलिहाऊस मध्ये कष्ट करायला सुरुवात केली. या दरम्यान त्यांची ओळख जर्मनी ऍग्रोच्या रवी अडवाणी यांच्यासोबत झाली. त्यांच्या माध्यमातूनच त्यांनी पॉलिहाऊस मध्ये काढलेल्या फुलांचा पहिला चोपन्न हजार रुपयांचा तोडा दिल्लीमध्ये विकला व 14 महिन्यातच त्यांनी दहा लाख रुपयांचे कर्ज फेडले.
नाबार्ड ची मदत घेतली आणि स्थापना केली अभिनव फार्मर क्लबची
त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांना अनेक शेतकरी भेटत होते व यांच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पॉलिहाऊस मधील नियंत्रित शेती करायला सुरुवात केली. बोडके यांच्या प्रगत शेतीमुळे त्यांचा संपर्क मोठ्या प्रमाणावर वाढला व या दरम्यानच नाबार्डचे शेतकरी मंडळाचे मॅनेजर सुनील जाधव यांच्याशी त्यांची भेट झाली.
त्या भेटीदरम्यान सुनील जाधव यांनी बोडके यांना शेतकरी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले व लगेच बोडके यांनी शेतकरी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांनी एकत्र बोलावले व 15 ऑगस्ट 2004 यावर्षी अभिनव फार्मर्स क्लब या संस्थेची स्थापना केली.
क्लबच्या चांगल्या कामगिरीमुळे पुणे जिल्ह्यातील 330 शेतकरी या क्लबला जोडले गेले व आत्ताच्या घडीला 25000 पर्यंत सदस्य या क्लबच्या आहेत. विशेष म्हणजे सध्या या अभिनव शेतकरी क्लबच्या माध्यमातून इतर राज्यांमध्ये 113 ग्रुप काम करत आहेत. आंध्र प्रदेश तसेच मध्य प्रदेश राज्यांमध्ये देखील अभिनव फार्मर क्लब काम करत आहे.
ज्ञानेश्वर बोडके
यांची शेतमाल विक्रीची अभिनव पद्धतशेतीमालाची विक्री करायची परंतु यामध्ये व्यापाऱ्यांचा अंतर्भाव नको म्हणून त्यांनी अगोदर सर्वे पद्धत वापरण्याचे ठरवले. यामध्ये त्यांनी शहरांमध्ये सोसायटीमध्ये जे लोक राहतात त्यांना ताजा भाजीपाला घरपोच हवा असतो हे त्यांना सर्वे च्या माध्यमातून कळाले व त्यांनी अशा लोकांकडून खास करून विदेशी भाजीपाल्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होते हे त्यांना कळले. म्हणून त्यांनी या क्लबच्या माध्यमातून ब्रोकोली सारख्या परदेशी भाजीपाल्याची लागवड केली व मागणी तसा पुरवठा या तत्त्वाने थेट ग्राहकांना भाजीपाल्याची विक्री केली.
एवढेच नाही तर त्यांनी विक्री वाढवण्याकरिता शहरातील अनेक मॉलशी देखील करार केले. यामध्ये देखील बोडके यांनी पुढाकार घेतला व मॉलच्या खरेदी अधिकाऱ्यासोबत अभिनव फार्मर ग्रुपच्या सदस्यांनी करार केले व त्यांच्या मागणीनुसार पॅकिंग करून अभिनवच्या शेतीमालाची विक्री मॉलमध्ये सुरू केली.
एवढेच नाहीतर हॉटेल व्यवसायात देखील त्यांनी भाजीपाला विक्रीचे नियोजन केले. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा भाजीपाला लागत असतो. अशा अनेक हॉटेल व्यवसायकांशी अभिनव फार्मर क्लब कनेक्ट असल्यामुळे हॉटेलच्या मागणीनुसार भाजीपाला पुरवला जातो. या प्रयत्नामुळे अनेक हॉटेल चेनला अभिनव चे शेतकरी जोडले गेले आहेत व शेतीमालाची विक्री देखील करत आहे.
कारखान्यातील कामगारांसाठी देखील वापरली डेमो पद्धत
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील ताजा भाजीपाला हवा असतो. याकरिता देखील अभिनव फार्मर क्लबच्या सदस्यांनी पुढाकार घेतला व कारखान्याचे जे काही मॅनेजमेंट असते त्यांच्याशी चर्चा करून कारखान्यांच्या आवारामध्येच अभिनव फार्मर क्लबच्या माध्यमातून डेमो पद्धतीने भाजीपाला ठेवला जातो व एका कारखान्यांमध्ये सलग तीन दिवस भाजीपाला विक्रीसाठी ठेवला जातो.
त्यामध्ये जो कामगार क्लबच्या माध्यमातून भाजीपाला खरेदी करतो त्याचा मोबाईल नंबर घेतला जातो. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला संबंधित कामगाराच्या मागणीनुसार त्याला आवश्यक भाजीपाला कारखान्याच्या ठिकाणी जाऊन पुरवला जातो.
घरगुती ग्राहकांची चेन केली निर्माण
सामान्य ग्राहकाला देखील जोडता यावे याकरिता अभिनव फार्मर क्लबच्या माध्यमातून घरगुती ग्राहकांची देखील साखळी निर्माण करण्यात आली व अशा ग्राहकांना देखील अभिनव फार्मर क्लब च्या माध्यमातून यशस्वीपणे भाजीपाला पुरवठा केला जातो. एवढेच नाही तर शेतीसोबत ते दूध व्यवसाय देखील करत असून या क्लबच्या माध्यमातून अभिनव दूध नावाचे दूध बाजारपेठेमध्ये काही वर्षांपूर्वी सादर करण्यात आले आहे.
या सगळ्या प्रयत्नांमुळे अनेक दूध उत्पादक शेतकरी देखील अभिनव फार्मर क्लबला जोडले गेले असून भाजीपाल्याप्रमाणे थेट दुधाचे विक्री देखील करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा समूह उभा करून या एका शेतकऱ्याने असाध्य गोष्ट साध्य करून दाखवली आहे.