स्पेशल

साठेखत आणि खरेदी खत म्हणजे काय ? काय असतो दोन्हीमध्ये फरक ?

Real Estate:- जेव्हा आपण एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करतो तेव्हा अशा व्यवहारांमध्ये प्रामुख्याने साठेखत आणि खरेदी खत हे दोन शब्द कायम ऐकायला येतात. कारण या दोन्ही प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या तर यामध्ये संबंधित प्रॉपर्टीच्या मालकी संदर्भातील महत्वाच्या बाबी नमूद केलेल्या असतात.

तुमचा प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार कशा पद्धतीने होत आहे किंवा कशा पद्धतीने पार पाडला जात आहे? यावर हे दोन्ही प्रकार अवलंबून असतात. त्यामुळे या लेखात आपण दोन्हींमधील फरक समजून घेऊ.

 साठे खत किंवा खरेदी खत म्हणजे नेमके काय?

एखाद्या प्रॉपर्टीचा खरेदीचा जो करार केला जातो. म्हणजेच प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये संपूर्ण रक्कम दिल्यानंतर जो करार होतो त्याला खरेदी खत असे म्हणतात. साधारणपणे साठे खत, साठे करार हा एखादी मिळकत भविष्यात खरेदी करायची असेल तर त्यासाठीचा एक करार असतो.

या करारा अंतर्गत दोन्ही पक्ष अटी आणि शर्तीनुसार मालकी हस्तांतरित करतात यासंबंधीची सर्व माहिती साठे करारामध्ये नमूद असणे गरजेचे असते. म्हणजे एकंदरीत जर बघितले तर खरेदी करार किंवा खरेदी खत आणि साठे खत प्रामुख्याने संबंधित प्रॉपर्टीचे मालकी हस्तांतरित करण्यासाठी केले जात असतात. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा फरक देखील असतो.

 काय असतो दोन्हीमध्ये फरक?

एखाद्या प्रॉपर्टीच्या मालकाकडून शेत जमीन, घर किंवा भूखंड, फ्लॅट खरेदी केला की त्याची मालकी हस्तांतरण ज्या  कराराच्या माध्यमातून होते त्याला आपण सेल डिड म्हणजेच खरेदी खत असे म्हणतो. मालमत्तेच्या मालकी हस्तांतरणाचा हा एक कायदेशीर प्रकार आहे.

एखादी मिळकत खरेदी करायचे असेल तेव्हा विक्री करणाऱ्या व्यक्तीसोबतचा हा करार असतो व त्याला खरेदीखत म्हटले जाते. परंतु या उलट एखाद्या प्रॉपर्टीचा व्यवहार जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दोन्ही पक्षात जो करार होतो त्याला साठे करार असे म्हटले जाते.

म्हणजेच एखादी मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठी साठे खत किंवा साठे करार केला जातो. अशा व्यवहारांमध्ये भविष्यात पूर्ण रक्कम देण्यात आली की अंतिम खरेदीखत करण्यात येते.

जोपर्यंत अंतिम खरेदीखत करण्यात येत नाही तोपर्यंत साठे खत किंवा साठे करार अस्तित्वात असतो. संबंधित प्रॉपर्टी खरेदीदाराला कोणत्या अटी आणि शर्तींवर हस्तांतरित करण्यात येईल याची संपूर्ण माहिती साठे करारामध्ये नमूद करणे गरजेचे असते.

भारतीय नोंदणी कायद्यानुसार..

एक रुपयापेक्षा अधिक किमतीच्या मालमत्तेचे मालकी किंवा इतर हक्क हस्तांतरित करता येतात. याकरिता अशा प्रकारच्या व्यवहारांची कायदेशीर नोंदणी करणे देखील गरजेचे असते व त्यासाठी खरेदीखत हा महत्त्वाचा करार होतो. या उलट खरेदी खत होण्यापूर्वी साठे करार किंवा साठे खत हा खरेदीखत होण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने रक्कम देणे विषयीचा करार असतो.

त्यामुळे खरेदीदाराची मालकी प्रस्थापित होत नाही. संबंधित जागेवर हक्क सांगता येत नाही. संबंधित प्रॉपर्टीवर तुमचा कसलाही प्रकारचा हितसंबंध निर्माण होत नाही. याकरिता दुय्यम निबंधक कार्यालयातील रितसर प्रक्रिया करून मुद्रांक शुल्क भरून जमिनीच्या मूल्यानुसार मिळकतीसाठी कायदेशीर करार करणे आवश्यक असते.

 या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

1- खरेदीखत हा एक रकमी, मूल्यांकन झालेल्या मिळकतीचे मालकी हस्तांतर करणारा करार किंवा दस्तऐवज असतो.

2- साठे खत एखादी मिळकत भविष्यात हस्तांतरित करण्याचे वचन देणारा करार असतो.

3- मालकी हस्तांतरणासाठी असलेल्या अटी व शर्तींचे दोन्ही पक्षांनी पालन करणे गरजेचे असते.

4- साठे करार केल्यामुळे प्रस्तावित खरेदीदाराला संबंधित मिळकतीचा  कुठल्याही प्रकारचा हक्क मिळत नाही.

5- कालांतराने विक्रेत्यांनी खरेदीदाराला साठे करारानुसार रक्कम मिळून देखील मिळकतीची मालकी हस्तांतरित केली नाही तर खरेदीदाराला स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 च्या कायद्यानुसार दाद मागता येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts