Ropvatika Anudan Yojana : केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून शेतकरी बांधवांना कायमच मदत दिली जात असते. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासनाकडून आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना सहाय्य दिले जाते, अनुदान दिले जात असते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले जीवनमान सुधारावे हाच या योजनेमागील हेतू असतो. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारण्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना रोपवाटिका म्हणजेच नर्सरी उभारण्यासाठी अनुदान मिळते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास पावणेतीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेबाबत काही महत्त्वाची माहिती तपशीलवार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि निकष
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी शेतकरी असावा.
अर्जदार शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर जमीन असावी.
अर्जदाराच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
तसेच पाण्याची शाश्वत उपलब्धता असणे आवश्यक.
खाजगी रोपवाटिकाधारक, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनेमधून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) या बाबीसाठी अनुदान घेतलेले शेतकरी यासाठी पात्र राहणार नाहीत.
अर्जदार शेतकऱ्यांची निवड कशी होते
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेच्या माध्यमातून लाभार्थी निवडताना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे. तसेच महिला गट, महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य दिले जाते. भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्यक्रम दिला जातो.
अनुदान किती मिळते बरं?
या योजनेच्या माध्यमातून रोपवाटिका उभारण्यासाठी अनुदान दिल जात. या अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारणीरिता 1000 चौरस मीटरच्या शेडनेट गृह, पॉलिटनेलसह साहित्य खर्चाच्या 50 टक्के 2 लाख 77 हजार 500 रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्याचे प्रावधान आहे.
हे पण वाचा :- पुण्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी मिळणार नुकसान भरपाई, पशुसंवर्धन विभागाची माहिती
अनुदान वितरणाचे स्वरूप
या योजनेअंतर्गत अनुदान दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्याला मिळते. पहिल्या टप्प्यात 60 टक्के अनुदान दिले जाते. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प उभारणीनंतर प्रथम मोका तपासणी झाल्यानंतर अनुदानाचा पहिला टप्पा वितरित होतो. यानंतर दुसऱ्या टप्प्यात 40 टक्के अनुदान मिळते. रोपवाटीकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री, उचल झाल्यावर मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत द्वितीय मोका तपासणी करून दुसऱ्या टप्प्यातील अनुदान पात्र लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होत.
अर्ज कसा करावा लागतो?
या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज केला जातो. किंवा इच्छुक शेतकरी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देखील अर्ज करू शकतात.
कोणती कागदपत्रे लागतात?
अर्जदार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये अर्जदार शेतकऱ्याला 7/12 व 8 अ चे उतारे, अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड, आधार संलग्न बँक खात्याच पासबुक, अर्जदार जर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला.
हे पण वाचा :- धक्कादायक! संपात सामील झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय, ‘हे’ परिपत्रक झाले निर्गमित