स्पेशल

एखाद्याला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT, IMPS चांगले की RTGS? काय आहे या तिन्ही प्रकारामध्ये फरक? वाचा माहिती

सध्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आणि इंटरनेटच्या वापरामुळे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने तुम्हाला जर एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला बँकेत जाण्याची आता गरज भासत नाही. तुम्ही अगदी यूपीआयच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतात.

या व्यतिरिक्त आपल्याला माहित आहे की बँकांच्या माध्यमातून देखील ग्राहकांना त्वरित पैसे ट्रान्सफर करता यावे याकरिता अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. बँकांमधून जर एखाद्याला निधी ट्रान्सफर करायचा असेल तर प्रामुख्याने आपण नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटी, तात्काळ पेमेंट सर्विस म्हणजेच आयएमपीएस आणि द रियल टाईम क्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस इत्यादींचा  वापर करतो.

बरेच जण या तिन्ही पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करतात. परंतु तुम्हाला माहित आहे का या तिन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय पैसे पाठवण्यासाठी योग्य तसेच जलद व कार्यक्षम आहे. चला तर मग या लेखात आपण या तिन्ही प्रकारांची माहिती जाणून घेऊ.

 पैसे पाठवण्याच्या या तिन्ही प्रकारांमध्ये काय आहे फरक?

1-NEFT( नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड्स ट्रान्सफर)- एनईएफटी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून चालवली जाणारी केंद्रकृत पेमेंट प्रणाली आहे. या माध्यमातून अनेक फायदे आपल्याला मिळतात. या सुविधेच्या माध्यमातून भारतात कोठेही तुम्ही 24 तास पैसे ट्रान्सफर करू शकतात व ही सुविधा वर्षातील 365 दिवस उपलब्ध आहे.

या सुविधेच्या माध्यमातून जवळपास रियल टाईममध्ये निधी ट्रान्सफर करता येतो. तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करून ही सुविधा घरी बसून देखील वापरू शकता. NEFT चा वापर करून निधी हस्तांतरित करताना व्यवहार सहसा दोन तासांमध्ये पूर्ण होतो. ज्या खात्यात तुम्ही ही सुविधा वापरतात त्या खात्यामध्ये ही रक्कम पोहोचते.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने एनइएफटी द्वारे पैसे पाठवण्यासाठी कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही. परंतु वेगवेगळ्या बँका त्यांच्या मर्यादा लागू करू शकतात. साधारणपणे दहा हजार रुपये पर्यंतच्या ट्रान्सफरसाठी 2.5 रुपये अधिक जीएसटी आणि दोन लाख रुपयापेक्षा जास्त ट्रान्सफरसाठी 25 रुपये अधिक जीएसटी भरावा लागतो.

2- आयएमपीएस( तात्काळ पेमेंट सेवा)- ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे चालवली जाते व या माध्यमातून त्वरित निधी हस्तांतरण करता येते. ही सुविधा देखील 24 तास उपलब्ध असते व तुम्ही मोबाईल तसेच इंटरनेट व बँक शाखा व एवढेच नाही तर एटीएमच्या माध्यमातून देखील वापरू शकतात.

हा एक पैसे ट्रान्सफर करण्यासाठीचा सुरक्षित आणि स्वस्त पर्याय आहे. या पर्यायाअंतर्गत तुम्ही ज्याच्या खात्यावर पैसे पाठवत आहात त्याच्या बँकेच्या मंजुरीनंतर लगेच निधी ट्रान्सफर होतो. त्यासाठी लागणारे शुल्क प्रत्येक बँकेमध्ये बदलू शकते व साधारण दोन लाख रुपयापर्यंतचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 25 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते.

3- आरटीजीएस म्हणजे रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची ही एक सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रणाली असून मोठ्या प्रमाणावर पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ही एक उत्तम पद्धत मानली जाते. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आरटीजीएस द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कुठलीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

तुमच्यासाठी ही सुविधा 24 तास सुरू राहते. या पर्यायाच्या माध्यमातून दोन ते पाच लाख रुपयांच्या व्यवहाराकरिता 24.50 अधिक कर आकारला जातो. तसेच पाच लाख रुपये पेक्षा जास्त व्यवहारांकरिता 49.50 रुपये अधिक कर आकारला जातो.

कोणती पद्धत चांगली आहे?

आपण पाहिले त्यानुसार कार्यक्षम आणि जलद निधी ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही तुमच्या गरजेनुसार या तिन्ही पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय वापरू शकता. परंतु यामध्ये एनईएफटी हा पर्याय कोणत्याही उच्च मर्यादा आणि किमान शुल्काशिवाय जवळच्या रियल टाईम निधी ट्रान्सफर साठी चांगला मानला जातो. दोन लाख रुपयांपर्यंत पैसे झटपट ट्रान्सफर करण्यासाठी आयएमपीएस हा उत्तम पर्याय आहे. तसेच त्वरित सेटलमेंटसह मोठ्या व्यवहारांसाठी आरटीजीएस योग्य आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts