Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. खरे तर बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे सीएम पदाचे कॅंडिडेट होते.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, संगमनेरचे 40 वर्षांपासून केलेले प्रतिनिधित्व हे सारे असतानाही नवख्या अमोल खताळ यांनी विखे पाटील यांची रसद घेऊन थोरात यांना जोरदार धक्का दिला आहे. यामुळे संगमनेरच्या या निकालाची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे.
संगमनेरात नेमकं काय घडलं, पराभवाची नेमकी कारणे काय? याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आपल्या पराभवावर बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी म्हटल्याप्रमाणे, निकाल तर धक्कादायक आहेच, पण यामध्ये अनेक शंका जनसामान्यांच्या मनात येतात हे नाकारता येत नाही.
धर्माचा उपयोग, पैशाचा उपयोग, काही योजना , केवळ राजकारणासाठी वापरण्यासाठी घेतल्या, हे सुद्धा कारण आहे, याच्यातून त्यांना या जागा मिळालेल्या आहेत. खर म्हणजे यश नाही, त्यांनी ओढूण ताणून यश मिळवलेलं आहे.
क्लृप्त्या करुन यश मिळवलेलं आहे, असं म्हणतं बाळासाहेब थोरात यांनी महायुतीने गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू केलेल्या योजनांमुळेच त्यांचा विजय झाला असून हा विजय नसून ओढून ताडून यश मिळवलय अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना थोरात यांनी, खर म्हणजे ना कुणाला रोजगार दिला, महागाई कमी केली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या भ्रष्टाचाराची चौकशी केली नाही, ना स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रकरणात लोकांना उत्तरं दिली, याच्यात कसं यश मिळतं याबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत.
ज्या साधनांचा वापर भाजप करत आहे, तो लोकशाहीला मोठा धोका आहे. कोणता दर्जा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा असणार याची काळजी आहे. पुढच्या काळात लोकशाही कुठं जाईल याची काळजी वाटणारी ही निवडणूक आहे, असं म्हणतं बाळासाहेब थोरात यांनी निकालावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.