Satbara Utara: सातबारा उतारा हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याला जमिनीचा आरसा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु बऱ्याचदा सातबारा उताऱ्यावर नावामध्ये किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टीत चूक झालेली दिसून येते. अशा चुका या प्रामुख्याने जेव्हा सातबारा हाताने लिहिले जात होते तेव्हा प्रामुख्याने झालेल्या आहेत. यामध्ये बऱ्याचदा नावामध्ये चूक किंवा शेतकऱ्याकडे जितके क्षेत्र असते त्यापेक्षा कमी किंवा जास्त नोंदवले जाणे अशा प्रकारच्या चुका दिसून येतात.
या चुकांचा खूप मोठा त्रास शेतकऱ्यांना बऱ्याचदा सहन करावा लागतो. तसेच अशा चुका दुरुस्त करण्यासाठी बऱ्याचदा तलाठी कार्यालयाच्या चकरा मारणे क्रमप्राप्त होते. परंतु आता ही झंझट संपणार असून तुम्हाला आता सातबारा उताऱ्यावरील चुकांची दुरुस्ती करायची असेल तर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे व ही सुविधा कालपासून म्हणजेच मंगळवारपासून पूर्ण राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
या सुविधेची पार्श्वभूमी पाहिली तर जमाबंदी आयुक्तालयाने राज्याचा महसूल विभागाकडे संगणीकृत किंवा हस्तलिखित सातबारे उताऱ्यांमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव दिलेला होता व या प्रस्तावाला आता राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर दोन कोटी 62 लाख सातबारे उतारे असून या उताऱ्यांमध्ये बऱ्याचदा हाताने सातबारा लिहिताना किंवा कम्प्युटरवर टायपिंग करताना काही चुका झालेल्या आहेत व या चुका आता दुरुस्त करता येणार आहेत. सातबारा उतारा मधील चुका दुरुस्ती करण्याचे अधिकार हे प्रामुख्याने तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
सातबारा उताऱ्यावरील चुका अशा पद्धतीने होणार दुरुस्त
सातबारा उताऱ्यामध्ये ज्या काही चुका झालेले आहेत त्या दुरुस्त करण्यात याव्यात याकरिता अनेक अर्ज दाखल झालेले असून ते तहसीलदारांच्या पातळीवर प्रलंबित आहेत. कारण आतापर्यंत पाहिले तर ही प्रक्रिया लिखित स्वरूपात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येते. आता ऑनलाईन पद्धतीने किती अर्ज प्रलंबित आहेत याचे एक योग्य रेकॉर्ड ठेवणे शक्य होणार आहे.
याकरिता नागरिकांना आता ई हक्क पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी असलेल्या सातबारा फेरफार यावर क्लिक करून या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे. लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून हे अर्ज संबंधितांकडे गेल्यानंतर तलाठी संबंधित कागदपत्रांची पुरावे तपासतील व आवश्यक गोष्टींची पूर्तता करून ती दुरुस्ती तहसीलदारांकडे मान्यतेसाठी पाठवली जाणार आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत पाच लाख अर्ज ऑफलाइन पद्धतीने दुरुस्तीसाठी दाखल झाले असून ते प्रलंबित आहेत.
या पाच लाख पैकी साधारणपणे एक लाख पेक्षा जास्त अर्ज ऑनलाईन पद्धतीने आले आहेत व त्यातील 59230 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. अजून देखील 39 हजार पेक्षा जास्त अर्ज त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रलंबित आहेत.या पार्श्वभूमीवर आता राज्यातील जितके जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यांमध्ये सातबारा दुरुस्तीच्या अर्जांचा आढावा घेण्याची सूचना देखील आता सर्व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले असून जे अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल झालेले आहेत अशा अर्जांची आता ऑनलाईन एन्ट्री करण्याच्या सूचना देखील देण्यात आले आहेत.
ऑनलाइन दुरुस्तीचे हे फायदे मिळतील
आता या ऑनलाइन पद्धतीमुळे सातबारा दुरुस्तीसाठी जो काही अर्ज आहे तो कोणत्या ठिकाणी प्रलंबित आहे याची नेमकी माहिती घेणे शक्य होणार आहे. तसेच संबंधित अर्ज का प्रलंबित आहेत याची देखील कारणे कळणार असल्यामुळे अर्ज ताबडतोब निकाली काढण्यातील दिरंगाई आता टाळता येणार आहे.
तसेच यामुळे आता अर्ज गहाळ होण्याची शक्यता देखील राहणार नाही. तसेच अर्जांवर सुनावणी घेणेदेखील आता शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ई हक्क पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी सातबारा, फेरफार दुरुस्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.