Ahmednagar Politics : भाजपचे युवा नेते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मंगळवारी शरद पवारांच्या गाडीतून प्रवास केला. विवेक कोल्हे हे लवकरच महाविकास आघाडीत येण्याच्या चर्चांना, यामुळे नवा पुरावा मिळाला. शरद पवार हे राजकारणात धक्के देण्यात एक्स्पर्ट आहेत. त्यामुळे विवेक भैय्यांची नाराजी पवार कॅच करणार नाहीत, असं होणारच नव्हतं. विशेष म्हणजे पवारांनी स्वतःच्या गाडीत घेत विवेक कोल्हेंना पुण्यात फिरवलं. या प्रवासाचे धक्के मात्र, नगरच्या राजकारणात बसले… विवेक कोल्हे महाविकास आघाडीत आले, तर नगरच्या राजकारणात मोठी गम्मत येणार आहे. आता हे धक्के कसे लागणार व ती गम्मत कोणती येणार, तेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत.
कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले विवेक कोल्हे हे सध्या भाजपात आहेत. हे दोघेही महायुतीत असल्यानं एकाला तिकीट मिळणार व एकाला थांबावं लागणार, हे निश्चित आहे. पण या दोघांपैकी थांबण्याच्या मनस्थितीत कुणीच नाही. दुसरीकडे, अजितदादांनी एकाच महिन्यात दोनदा कोपरगावला भेट देऊन, आशुतोष काळेंच्या तिकीटावर जवळपास शिक्कामोर्तबच केलं. म्हणजेच कोपरगावची जागा महायुतीत अजितदादाच लढवणार, हे फिक्स झालं. आता विवेक कोल्हे काय करणार, हा खरा प्रश्न होता. त्याच प्रश्नाचं उत्तर विवेकभैय्यांनी मंगळवारी दिलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुण्यात झाली. या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार व विवेक कोल्हेंची भेट होणारच होती. तशी ती झाली. मात्र खरी गम्मत आली, ती बैठक संपल्यानंतर… परतीच्या प्रवासात पवारांनी विवेक कोल्हेंना थेट आपल्या शेजारी, आपल्याच गाडीत बसवलं. पवार-कोल्हेंच्या या पुण्यातील प्रवासाचे धक्के, मात्र थेट नगरच्या राजकारणाला बसले.
मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल, या धक्के बसण्यासारखं काय आहे.. ? सांगतो, सांगतो… त्यासाठी आपल्याला नगरचं नात्यागोत्याचं राजकारण पहावं लागेल. कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांचा मुलगा उदयन गडाख यांचे सख्खे साडू. शेवगावचे मा. आमदार चंद्रशेखर घुले यांची मोठी मुलगी काळेंच्या, तर छोटी मुलगी डाँ. निवेदीता ही गडाखांच्या घरची सून आहे. त्यामुळे विवेकभैय्या हे विधानसभेसाठी ठाकरे गटात आले तर, गडाखांची गोची होणार आहे. त्यावेळी गडाख हे विवेक कोल्हेंच्या म्हणजेच काळेंच्या विरोधात प्रचारासाठी जातील का, हा प्रश्न आहे.
आता विवेक कोल्हे, शरद पवार गटात गेले तर काय होईल ते पाहू… माजी आ. नरेंद्र घुले व राहुरीचे माजी खासदार प्रसाद तनपुरे हे एकमेकांचे सख्खे साडू. म्हणजेच आशुतोष काळे यांच्या पत्नी चैताली या प्राजक्त तनपुरे यांच्या नात्याने मावस बहीण आहेत. याच नात्याने शरद पवार गटाचे ज्येष्ठ नते जयंत पाटील यांचेही आशुतोष काळे हे भाचे जावई लागतात. कारण चैताली काळे यांचे जयंत पाटील हे मामा आहेत. त्यामुळे विवेक कोल्हे शरद पवार गटात आले तर, प्राजक्त तनपुरे व जयंत पाटील या मामा-भाच्यांचीही पंचाईत होणार आहे. आशुतोष काळेंविरोधात प्रचारासाठी ते जातील का, हे पाहणेही त्यावेळी मनोरंजक ठरेल.
आता विवेक कोल्हे काँग्रेसमध्ये आले तर..? तेव्हाही गंमत येईल. कारण ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचेही गडाख-राजळे- तनपुरे-घुले आणि काळे कुटुंबासोबत सोयीरसंबंध आहेत. थोरात व कोल्हेंच्या जोडगोळीने यापूर्वी अनेक निवडणुकांत हातात हात घेत निवडणुका लढविल्यात. पण त्या सगळ्या विखेंविरोधात… त्यामुळे थोरात या निवडणुकीत कोल्हेंना साथ देण्यासाठी, काळेंवर टिका करतील का, हेही पाहणे मनोरंजक राहणार आहे…
मित्रांनो, ही गम्मत जम्मत झाली कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठीची… पण विवेक कोल्हे महाविकास आघाडीत येऊन खरंच कोपरगावातून लढतील का, की थेट विखेंविरोधात शिर्डीतून लढतील, हाही एक प्रश्न आहे. शरद पवारांच्या डोक्यात नेमका काय प्लॅन आहे, हे आगामी काळात समजेलच… पण सध्यातरी कोल्हेंच्या महाविकास आघाडीत येण्याने राजकारणात गम्मत येणार, एवढं मात्र खरं…