नुकतीच नवीन वर्षाची सुरवात झाली, आपण साऱ्यांनी मिळून 2025 च वाजत-गाजत स्वागत केलं. नववर्षाच्या स्वागतावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाल. शेअर बाजारात सुद्धा नववर्षाचे पहिले दोन दिवस अगदीच उत्साहाचे वातावरण राहिल. गुंतवणूकदारांनी नवीन वर्षात शेअर बाजारातून चांगल्या कमाईच्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत. कारण म्हणजे गेल्या वर्षी प्रचंड चढ-उतार होते, रशिया-युक्रेन युद्ध, इजरायल व हमास यांच्यातील युद्ध, इरान अन इराकमधील वाढलेला तणाव या घटना संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या होत्या. पण तरीही 2024 मध्ये सेन्सेक्स-निफ्टीने सुमारे 8 ते 9 टक्के सकारात्मक रिटर्न दिला.
गुंतवणूकदारांनी लार्जकॅपमध्ये सर्वाधिक रिटर्न मिळवला. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. नवीन वर्ष सुरू झाल्याबरोबर शेअर बाजाराला पुन्हा झळाळी आली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन जानेवारीला सलग दुसऱ्या दिवशी चांगली तेजी राहिली. दोन्ही इंडेक्समध्ये एक टक्क्याहून अधिक तेजी राहिली. काल, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स सुमारे 1400 अंकांनी वाढून 79,900च्या पातळीवर गेला. निफ्टी 440 अंकांनी वाढून 24,150च्या पलीकडे गेला.
सर्वाधिक तेजी आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये पाहायला मिळाली. तरीही, या वर्षी भू-राजकीय परिस्थिती, महागाई दर, व्याजदर, दुसऱ्या सहामाहीत कॉर्पोरेट कमाई आणि परदेशी गुंतवणूक हे महत्त्वाचे ट्रिगर्स असतील. यातूनच बाजाराची भविष्यातील वाटचाल ठरणार आहे. पण, आता आपण नववर्षाच्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये तेजी येण्याचे कारण काय ? हा ट्रेंड पुढे पण असाच कायम राहणार का ? कोणकोणते सेक्टर तेजीत असतील ? याचा आढावा आजच्या स्पेशल रिपोर्ट मधून घेणार आहोत.
मित्रांनो, मार्केट एक्स्पर्ट्सच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारात आलेली तेजी चार मोठ्या कारणांमुळे आली.
पहिलं कारण – टेक्निकल ट्रेंड : शेअर बाजारातील तज्ञ सांगतात की, निफ्टी आपल्या 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजपेक्षा वाढला अन म्हणूनचं बाजाराच्या तेजीला सपोर्ट मिळाला. 23,770 ची पातळी ओलांडल्यानंतर कन्सॉलिडेशनची अपेक्षा होती. निफ्टी 23,850 च्या वर राहिला, तर तो 24,025 पर्यंत जाऊ शकतो. अस्थिरता हा एक चिंतेचा विषय बनलेला ; मात्र या पातळीवर घसरण होण्याची शक्यता कमीच दिसते.
दुसरं कारण – उत्तम जीएसटी कलेक्शन : मित्रांनो, शेअर बाजारातील तेजीचे दुसरे कारण म्हणजे उत्तम जीएसटी कलेक्शन, डिसेंबर महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.3 टक्के वाढ होऊन ते 1.77 लाख कोटी रुपयांवर गेलं. त्यावरून कंझम्पशन वाढल्याचं दिसतं. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की ही वाढ म्हणजे आर्थिक व्यवहारांमध्ये झालेल्या सुधारणांचा संकेतचं अन म्हणून गुंतवणूकदारांचा सेंटिमेंट दृढ होऊ शकतो. स्थिर मागणी आणि अर्थव्यवस्थेचं चांगलं आरोग्य उत्तम जीएसटी कलेक्शनवरून दिसून येतं.
तिसर कारण – आयटी सेक्टरमध्ये उसळी : आयटी सेक्टर मध्ये आलेली उसळी हे शेअर बाजारातील तेजीचे एक मोठे कारण. गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात असलेल्या तेजीमध्ये सर्वांत महत्त्वाचं योगदान हे आयटी शेअर्सचं राहीलं. काल, दोन जानेवारीलाही आयटी इंडेक्समध्ये एक टक्क्यापेक्षा अधिक तेजी आली. सीएलएसए आणि सिटी या दोन्हींचं असं म्हणणं आहे, की स्थिर मागणी आणि रुपयामध्ये घसरण यांमुळे डिसेंबर तिमाहीमध्ये आयटी कंपन्यांची वाढ चांगली असू शकते.
चौथं कारण – चांगल्या तिमाही रिझल्ट्सची अपेक्षा : शेअर बाजाराला कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीचे रिझल्ट्स चांगले राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑटो आणि फायनान्शियल सेक्टर्समधून चांगल्या बातम्या अन अपडेट कानावर येत आहेत. मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि सीएसबी बँक यांसारख्या कंपन्यांचे बिझनेस अपडेट पाहिल्यानंतर चांगल्या तिमाही रिझल्ट्सची अपेक्षा आणखी वाढली आहे. लवकरच लग्नसराईचा, सणासुदीचा अन लग्नाचा हंगाम सुरू होईल. याचा परिणाम म्हणून ऑटो आणि फायनान्शिअल सेक्टरमध्ये परत वाढ होईल. यासोबतच ज्वेलरी, हॉस्पिटॅलिटी यांसारखे लक्झरी सेक्टर्स देखील चांगली कामगिरी करतील असा अंदाज आहे.
मंडळी महत्वाचे म्हणजे शेअर बाजारातील काही तज्ञ असं सांगतायेत की, कन्सॉलिडेशनचा दुसरा आठवडा असं दाखवतोय, की हा ट्रेंड पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील काळात ट्रेडर्सने खासकरून फार्मा आणि एफएमसीजी सेक्टर्समध्ये, विशेषता या सेक्टरमधील मजबूत मोमेंटम दर्शवणाऱ्या शेअर्सवर लक्ष ठेवलं पाहिजे.