भारतामध्ये आपल्याला अनेक गोष्टींमध्ये विविधता दिसून येते. जसे ती विविधता भौगोलिक दृष्टीने आहे तशी ती प्रत्येक राज्यांच्या चालरीती तसेच तिथल्या लोकसंस्कृती, खाद्य संस्कृती आणि बोली भाषेत देखील आपल्याला दिसून येते. भारतामध्ये प्रत्येक राज्याचे असे वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत परंतु राज्यांमधील जिल्ह्यांची देखील अनेक प्रकारे वेगवेगळे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते
व हे वेगळेपण आपल्याला पिकांच्या उत्पादनापासून तर त्या जिल्ह्यातील लोकांच्या बोलीभाषेत देखील आढळून येते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही गोष्टींमध्ये भारतात विशेषता दिसून येते.
परंतु जर भारतातील ही विशेषता एखाद्या बाजारपेठेच्या बाबतीत जर बघितली तर ती आपल्याला मणिपूर मधील इम्फाळ येथे दिसते. कारण या ठिकाणी एक मार्केट आहे व त्या मार्केटमधील दुकानांची सगळी मालकी फक्त महिलांकडे आहे. या मार्केटमधील पाच हजारांपेक्षा जास्त दुकाने केवळ महिला चालवतात. त्यामुळे ही बाजारपेठ भारतातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
पाचशे वर्ष जुनी आहे इम्फाळ येथील इमा किथेल बाजारपेठ
मणिपूर राज्याची राजधानी असलेल्या इम्फाळ येथेही बाजारपेठ असून या बाजारपेठेचे नाव इमा किथेल असून ते आशिया खंडातील सर्वात मोठी महिला बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. याच बाजारपेठेला मदर्स मार्केट म्हणून देखील ओळखतात व हा बाजार पाचशे वर्षे जुना असून यामध्ये जवळपास 5000 पेक्षा जास्त महिला आपली दुकाने चालवून त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय करतात.
या बाजारपेठेमध्ये व्यवसाय महिला करतात व वस्तूंची खरेदी करण्यासाठी पुरुष येतात.फक्त हमाल किंवा सुरक्षारक्षक आणि चहा विक्रीचे काम फक्त पुरुषांच्या माध्यमातून केले जाते व बाकीचे मार्केट फक्त महिलांनीच काबीज केलेले आहे.
हे मार्केट 500 वर्षापेक्षा जुने असून सोळाव्या शतकामध्ये काही महिलांनी एकत्र येऊन या ठिकाणी दुकानांची सुरुवात केली होती व आज तीन बहूमजली इमारतीत ही बाजारपेठ दिमाखात उभी आहे. या बाजारपेठेमध्ये तुम्हाला मणिपुरी मिठाई तसेच कपडे, गालिचे तसेच टेराकोटा मातीची भांडी आणि सर्टिफाईड हॅंडीक्राफ्ट खरेदी करता येऊ शकतात.
महिलांच्या हातात कशी आली बाजारपेठेची कमान?
सोळाव्या शतकाची गोष्ट जर पाहिली तर मणिपूर मध्ये कामगार व्यवस्था सक्रिय असल्याने या ठिकाणाच्या मैती समुदाय (लोकसंख्येच्या 50% प्रतिनिधित्व करतो) त्या समुदायातील लोकांना इतर देशांमध्ये काम करण्यासाठी किंवा युद्ध लढण्यासाठी भाग पाडण्यात आले होते व त्यामुळे खेड्यापाड्यात फक्त स्त्रियाच दिसून येत होत्या.
या स्त्रियांवर संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्याची म्हणजेच उदरनिर्वाहाची जबाबदारी येऊन पडली होती. यामुळेच कपडे विणणे आणि हाताने तयार केलेली उत्पादने स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्याच्या महिलांनी सुरुवात केली.
हळूहळू या जागेने मोठे बाजारपेठेचे स्वरूप धारण केले.इमा केथेल बाजारपेठेमध्ये महिला घरगुती वस्तू पासून हस्तकला आणि कपड्यांपर्यंत सर्व काही खरेदी आणि विक्री करत असतात. म्हणजे या बाजारपेठेचे सगळे नियम आणि त्याच्या आवश्यक महत्त्वाच्या गोष्टी या महिलांनी ठरवलेल्या आहेत व हा बाजार आज महिलांसाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही याची साक्ष देतो.