स्पेशल

…..तर मी आमदारकीचा राजीनामा देणार! विक्रम पाचपुते यांनी दिलं ओपन चॅलेंज

Shrigonda MLA Vikram Pachpute : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता सात दिवस झालेत. मात्र निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस उलटल्यानंतरही राज्यात नवीन सरकार स्थापित झालेले नाही. निवडणूक निकालात जनतेने पुन्हा एकदा महायुतीला कौल दिला आहे.

महायुती मध्ये समाविष्ट भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला प्रचंड यश मिळाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा या निवडणुकीत पूर्ण सुपडा साफ झाला आहे.

महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागा देखील मिळवता आल्या नाहीत. पण, महाविकास आघाडीने निवडणुकीचा हा निकाल संशयास्पद असल्याचे म्हटले असून महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर खापर फोडले आहे.

अहिल्या नगर जिल्ह्यातील अनेक पराभूत उमेदवारांनी इव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा एकदा फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज देखील भरले आहेत.

कोपरगावचे पराभूत उमेदवार संदीप वर्पे, राहुरीचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे, पारनेरच्या पराभूत उमेदवार राणी लंके यांच्यासह कर्जत जामखेडचे भाजपाचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी EVM च्या फेरमतमोजणीसाठी अर्ज सादर केले आहेत.

असे असतानाच श्रीगोंद्याचे नवनिर्माचित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी एक ओपन चॅलेंज दिले आहे. भाजपाचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर विक्रम पाचपुते यांचे विधान चर्चेत आले आहे.

विक्रम पाचपुते यांनी यासंदर्भात बोलताना, निवडणूक आयोगावर माझा पूर्ण विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा झाला असेल तर आधी मी समोर येईन आणि पुन्हा निवडणुकीला सामोरा जाईन असे विधान केले आहे.

तसेच विक्रम पाचपुते यांनी, मी वडील बबनराव पाचपुते यांच्या निवडणुकीवेळी निवडणूक प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रात असायचो. त्यावेळी एकदा समोरच्या उमेदवारानं आक्षेप घेतला होता.

यानंतर व्हीव्हीपॅटची मतं आणि ईव्हीएमची मतं मोजली गेली होती. ही दोन्ही मते बरोबर निघाली होती. त्यात काहीच चूक नव्हती. या गोष्टी माहिती असताना देखील शंका उपस्थित केल्या जात आहेत.

ते म्हणालेत की, आमच्या मतदारसंघात एकूण 345 ईव्हीएम मशीन होत्या आता या सगळ्याच मशीनमध्ये छेडछाड कशी होणार? मतदान केंद्रावरही पोलिंग बूथ एजंटच्या सह्या असतात. आता फक्त आरोप करून लोकांची दिशाभूल केली जात आहे.

दरम्यान, यावेळी रामाभाऊंच्या फेर मतमोजणी अर्जाबाबत विचारणा झाली असता पाचपुते यांनी माझा निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. या प्रक्रियेवर शंका उपस्थित झाली तर विक्रमसिंह पाचपुते हा पहिला आमदार असेल जो राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाईल असे म्हटले आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts