Snake Bite:- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्पदंशाच्या घटना घडतात. प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये याचे प्रमाण जास्त असते व शहरी भागाच्या तुलनेने सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त पाहायला मिळते. कारण बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतीमध्ये पिके वाढलेले असतात
व पावसाच्या कालावधीमध्ये साप अंडी देखील घालतात व काही प्रजातींचे साप पिल्लांना जन्म देतात. जर आपण भारताचा विचार केला तर खूप प्रकारच्या सापांच्या प्रजाती आहेत परंतु त्यातल्या फक्त चारच प्रजाती माणसाचा जीव घेण्याला समर्थ आहे. त्या चार जातींचा विचार केला तर त्यातील पहिली म्हणजे मन्यार, दुसरा घोणस, तिसरा फुरसे आणि चौथा नाग होय.
पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना का वाढतात?
जर पावसाळ्याचा विचार केला तर इतर ऋतूंच्या तुलनेमध्ये पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना जास्त दिसून येतात. हिवाळ्यामध्ये साप बिळ्यांमध्ये लपून राहतात आणि पूर्ण हिवाळ्याभर ते झोपतात. उन्हाळ्यात मात्र ते बिळातून बाहेर येतात व त्यावेळी अंडी घालतात. उन्हाळ्यात घातलेली अंडी ते पावसाळ्यामध्ये उबतात आणि त्यातून लहान लहान पिल्ले बाहेर येतात.
पावसाळ्याच्या कालावधीमध्ये साप आणि त्यांची पिल्ले येणाऱ्या हिवाळ्याच्या झोपेची तयारी करत असतात व त्यासाठी ते सतत भक्षाच्या शोधात असतात. पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने सापाचे खाद्य समजले जाणारे उंदीर तसेच इतर किडे व बेडूक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे त्यांचा सतत इकडून तिकडे वावर असतो व लोकांच्या घराच्या आसपास देखील ते फिरतात.
ग्रामीण भागातील सर्पदंशाच्या घटनांबद्दल जर तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्या मते घरात अंधाऱ्या खोलीमध्ये सर्पदंशाचा प्रकार जास्त प्रमाणात दिसून येतो. ज्या ठिकाणी अंधार आहे किंवा प्रकाश कमी आहे अशा स्वयंपाक घर किंवा साठवणुकीचे एखादी खोली या ठिकाणी साप लपु शकतात व त्या ठिकाणी सर्पदशाच्या घटना घडू शकतात.
तसेच घरामध्ये ज्या ठिकाणी सापांना खायला मिळू शकते अशा ठिकाणी देखील साप सापडतात. ज्या ठिकाणी उंदीर, घुशी किंवा पाली असतात त्या ठिकाणी धान्य किंवा गवत ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी देखील साप दिसून येतात.
साप चावण्याआधी इशारा देतात का?
हा एक महत्वाचा प्रश्न असून आपण वर पाहिलेल्या विषारी जातीच्या सापांमध्ये मण्यार जातीचा साप सोडला तर इतर साप चावण्याआधी इशारा देतात असे तज्ञांचे म्हणणे आहे व याबाबतीत तज्ञ सांगतात की मन्यार जातीचा व त्यातल्या त्यात काळा मन्यार कधी चावेल याचा कोणताही भरोसा नाही.
परंतु इतर तीन जातींचे साप चावण्याआधी इशारा देतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर नाग फणा काढतो, फुरसे जातीचा साप फुत्कारतो आणि घोणस आपल्या शरीरावरचे खवले घासत विशिष्ट प्रकारचा आवाज त्या माध्यमातून निघतो. अशाप्रकारे पाहून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता.
तसेच तज्ञांच्या मतानुसार मन्यार जातीचा साप हा निशाचर असल्यामुळे त्याचा चावा होण्याच्या घटना या रात्रीच्या वेळेस घडतात. या जातीचा साप संध्याकाळपासून पहाटेपर्यंत फिरत असतात. मन्यार सोडून इतर जातींच्या सापाचा विचार केला तर सहसा ते बांधकामाच्या साइटवर किंवा शेतामध्ये दिसून येतात. अशा ठिकाणच्या मातकट तपकिरी रंगाच्या मातीमध्ये ते लपू शकतात व भक्षांना देखील कळत नाही.
साप चावल्यावर काय करावे?
दुर्दैवाने जर साप चावला तर त्या ठिकाणी सापाने चावा घेतला आहे तो भाग साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन टाकावा व त्या भागातलं रक्ताभिसरण कार्य थांबवण्याकरिता बोटभर पट्टी त्या ठिकाणी बांधावी व तातडीने डॉक्टरांकडे किंवा सरकारी दवाखान्यांमध्ये जावे.
साप चावल्यावर काय करू नये?
साप चावल्यावर अति घट्टपट्टी बांधू नका.या ठिकाणी घट्ट पट्टी बांधली तर अवयवातला रक्ताभिसरण पूर्ण थांबलं तर तो अवयव कापावा लागण्याची शक्यता असते. महत्वाचे म्हणजे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला जास्त हलवू नये. अशा व्यक्तीला जास्त हलवले तर विष शरीरामध्ये लवकर पसरण्याचा धोका संभवतो.