Marathi News : कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जगभरात कुतूहल कमी आणि भीतीच जास्त निर्माण केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता एकूणच मानव जातीवर आक्रमण करून त्याला निष्क्रिय करेल, असेही तारे तोडले जात आहेत.
मात्र, मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक आणि संगणक जगतातले तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे बिल गेट्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता फायद्याचीच ठरणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कर्मचारी किंवा कामगारांची ताकद जास्त रचनात्मक कामांत लावता येईल आणि त्या अनुषंगाने तीन दिवसांचा आठवडा म्हणजे आठवड्यातले तीन दिवसच काम ही पद्धत रूढ व्हायला वेळ लागणार नाही, असे भाकीत वर्तवले.
‘माणसाचे आयुष्य किंवा जीवन जगणे म्हणजे फक्त काम एके काम करणे नाही. हे सूत्र कधीच नव्हते. ते आपण निर्माण केले. तसे त्यापासून दूर जाण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला आठवड्यातून तीनच दिवस काम करणारा भवताल मिळत असेल तर तो नकोय का? असा सवाल केला.
‘व्हॉट्स नाऊ’ या ट्रेव्होर नोआ यांच्या पॉडकास्टसाठी मुलाखत देताना गेट्स यांनी भविष्यसूचक विचार मांडले. भविष्यातली यंत्रे मानवाची महत्त्वाची कामे करतील. त्याचे श्रम कमी करतील.
मागे वळून पाहिल्यास पिढ्यान्पिढ्या बदल होत गेले. ते लक्षात आले नाहीत किंवा आपण डोळेझाक केली. आपल्या आजोबांचे काम काय होते? तर शेती. त्यानंतर वडिलांनी शेतीसारख्या श्रमाच्या कामातून फारकत घेतली.
आजघडीला अमेरिकेत अवघे दोन टक्के नागरिकसुद्धा शेती करत नाहीत, हे वास्तव आहे. थोडक्यात, मोठ्या प्रमाणावर परंपरागत मतांपासून आपण दूर गेलोच ना, असे त्यांनी आपला मुद्दा पटवून देताना स्पष्ट केले.
तंत्रज्ञान वाढीस लागत आहे आणि सरकारने या बदलाला स्वीकारले तर हा सकारात्मक परिणाम म्हणायचा. यातून मानवाला नवे शिकण्याची संधी निर्माण हाणार आहे. सॉफ्टवेअरने बऱ्याच गोष्टी खूपच सोप्या केल्या.
पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्याला म्हणजेच माणसाला तुम्ही कामाच्या एकूणच तासांतून काहीशी मुक्तता मिळवून दिली तर त्याला वयस्कर कुटुंबीयांकडे लक्ष देता येईल.
इथे कृत्रिम बुद्धिमत्ता काहीच करू शकणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आली तरी तिला त्यासंदर्भातले कर्मचाऱ्यांचे बळ लागणारच की, असे ते आपल्या दाव्याला पुष्टी जोडताना म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे अपत्य म्हणजे चॅटजीपीटी हा एक चांगला बदल आहे. येत्या दशकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्षेत्र खूपच महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा कमी उत्पन्न असलेले देश किंवा नागरिकांना कसा करून देता येईल, यावर भर देणे गरजेचे आहे. – बिल गेट्स, सहसंस्थापक, मायक्रोसॉफ्ट