Soyabean Price : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम फारसा फायदेशीर राहिलेला नाही. सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना यंदा मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. गत हंगामात सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होणारे सोयाबीन या हंगामात पाच हजाराच्या आसपास विक्री होत आहे. यामुळे पिकासाठी झालेला उत्पादन खर्च देखील काढणे शेतकऱ्यांना मुश्किल वाटू लागले आहे.
अशातच बाजारातून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. चालू आठवड्यात देशांतर्गत सोयाबीन बाजारभावात काहीशी वाढ नमूद करण्यात आली आहे. याशिवाय जागतिक बाजारातही सोयाबीन आणि सोया पेंड तेजीत होते. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जेंटिना मध्ये दुष्काळी परिस्थिती आहे परिणामी तिथे सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे.
अर्जेंटिना हा सोयाबीनचा एक प्रमुख उत्पादक देश आहे. तिथे दुष्काळी परिस्थिती आणि सोयाबीनचे घटणारे उत्पादन लक्षात घेता याचा परिणाम जागतिक बाजारात पाहायला मिळत आहे. सध्या जागतिक बाजारात तेजी आहे. देशांतर्गत देखील या चालू आठवड्यात शंभर ते दीडशे रुपयांची वाढ नमूद करण्यात आली आहे. सध्या सोयाबीन 5200 ते 5500 दरम्यान विक्री होत आहे. शिवाय पुढील आठवड्यात दर वाढीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केला आहे.
तज्ञांच्या मते जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोया पेंड दर तेजीत आहेत. यामुळे भारतीय सोया पेंड मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. सोया पेंडची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. एकंदरीत अर्जेंटिना मध्ये जो दुष्काळ पडला आहे त्यामुळे अर्जंतीना मधून सोया पेंड निर्यात घटणार आहे. परिणामी सोया पेंड दरात तेजी आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सोया पेंडची मागणी वधारणी असून भविष्यात अजून वाढणार आहे.
यामुळे पुढल्या आठवड्यात आणखी दोनशे रुपयाची दरात सुधारणा होण्याचा अंदाज तज्ञ लोकांनी बांधला आहे. निश्चितच सध्या मिळत असलेला दर सोयाबीन उत्पादकांच्या अपेक्षप्रमाणे नसून किमान 7000 रुपये प्रति क्विंटल असा दर सोयाबीनला मिळावा अशी शेतकऱ्यांची आशा आहे मात्र तूर्तास सोयाबीनला शेतकऱ्याना अपेक्षित असा दर मिळत नसल्याचे चित्र असून भविष्यात देखील मोठी दरवाढ होणार नसल्याचे सांगितले जात आहे.