स्पेशल

सोयाबीन उत्पादक आता बनणार मालामाल ! सोयापेंडमुळे सोयाबीन बाजाराला मिळणारा आधार; दरात होणार ‘इतकी’ विक्रमी वाढ

Soybean Market News : सोयाबीन उत्पादकांना पुन्हा एकदा सुगीचे, आनंदाचे दिवस येणार आहेत. वास्तविक सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक मेजर क्रॉप आहे. या पिकाची राज्यभर लागवड केली जाते. विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात या पिकाची सर्वाधिक शेती पाहायला मिळते. प्रमुख तेलबिया पिक असल्याने याला नेहमीच चांगला दर मिळतो.

शाश्वतं उत्पन्न मिळत असल्याने या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा नेहमीच कल राहिला आहे. मात्र यंदा सोयाबीन उत्पादकांना सोयाबीन बाजाराने निराश केले आहे. हंगामाच्या अगदी सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावात आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून मात्र दरात वाढ होत आहे. दोनशे ते तीनशे रुपयांची दरवाढ नमूद करण्यात आली आहे.

सोयाबीन 5200 ते 5400 दरम्यान विक्री होत आहे. काही बाजारात याहीपेक्षा दर आहे तर काही बाजारात यापेक्षा थोडासा अधिक दर आहे. दरम्यान आता सोयाबीन उत्पादकांना अजून दिलासा मिळेल असे चित्र तयार होत आहे. प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र अर्जेंटिनामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादन कमी राहणार आहे. वास्तविक अर्जेंटिना सोयाबीन उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर असला तरी देखील या देशातून मोठ्या प्रमाणात सोया पेंड निर्यात होत असते.

अशा परिस्थितीत त्या ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन कमी होणार आहे म्हणजेच सोया पेंड निर्यात मंदावेल. जागतिक बाजारात अर्जेंटिना मधून सोया पेंड निर्यात कमी होण्याची शक्यता लक्षात घेता सोया पेंड दरात तेजी आली आहे. याचा फायदा भारतीय सोया पेंडला देखील होत आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात सोया पेंड निर्यातीची शक्यता यामुळे तयार झाली आहे. एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतातून पाच लाख टन इतकी विक्रमी सोयापेंड निर्यात यावर्षी होणार आहे.

साहजिक ही निर्यात वाढल्यास याचा थेट सोयाबीन दरावर परिणाम जाणवणार आहे. यामुळे सोयाबीन दरात वाढीसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा दावा निर्यातदारांनी केला आहे. हंगामाच्या सुरुवातीला अर्जेंटिनामध्ये 480 लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज होता. मात्र दुष्काळाची दाहकता एवढी अधिक आहे की आता आलेल्या सुधारित अंदाजानुसार त्या ठिकाणी केवळ 380 लाख टन सोयाबीन उत्पादन होणार आहे. साहजिकच 100 लाख टन सोयाबीनचे उत्पादन त्या ठिकाणी कमी राहणार असल्याने तिथे सोया पेंडचे दर विक्रमी भाव पातळीवर पोहोचले आहेत.

याचा परिणाम म्हणून भारतासारख्या इतर सोयाबीन उत्पादक देशांमधून आता सोया पेंडची मागणी वाढत आहे. कारण की, भारतीय सोया पेंड अर्जेंटिनाच्या तुलनेत स्वस्तात उपलब्ध होत आहे. विशेष बाब म्हणजे सातत्याने अर्जेंटिना मधील सोयाबीन उत्पादनात घट दाखवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सोया पेंडचे दर दिवसेंदिवस मजबूत बनत चालले आहेत. सोपाने सोया पेंड निर्यातीबाबत दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, आपल्या देशातून ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांमध्ये सोयापेंड निर्यात 65 टक्क्यांनी वाढली आहे.

या चारच महिन्यात सोयापेंड निर्यात 6 लाख 31 हजार टनांवर पोहचली आहे. खरं पाहता, मागील संपूर्ण हंगामात देशातून 6 लाख 44 हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती. म्हणजेचं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जर पाच लाख टन सोया पेंड निर्यातीचा अंदाज खरा ठरला तर या हंगामात तिप्पट सोया पेंड निर्यात आपल्या देशातून होणार आहे. सोया पेंडचीं मागणी वाढली म्हणजेच सोयाबीनचे गाळपं देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे देशांतर्गत सोया तेलाचा साठा वाढत असून सोयातेलाची आयात आता आपोआप कमी होणार आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारात सोयापेंड दर असेच तेजीत राहिले तर भविष्यात आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात सोया पेंड निर्यात होणार आहे. यामुळे सोयाबीन दराला देखील आधार मिळणार असल्याची शक्यता आहे. निश्चितच, येत्या काही दिवसात सोयाबीन दारात अजून तेजी नमूद केली जाऊ शकते. 5500 ते 6000 दरम्यान यंदा सोयाबीनला भाव मिळू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे. निश्चितच सोया पेंडचीं जरी विक्रमी निर्यात यंदा होण्याची शक्यता असली तरी देखील यंदा सोयाबीनला गेल्यावर्षीप्रमाणे दर मिळणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts