Soybean Market Update : यावर्षीचा सोयाबीन हंगाम हा शेतकऱ्यांसाठी विशेष लाभप्रद राहिलेला नाही. हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षाही कमी दर मिळत होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात यामध्ये थोडी सुधारणा झाली. सोयाबीन दराने 6,000 रुपये प्रति क्विंटल सरासरीचा टप्पा गाठला.
मात्र सद्यस्थितीला सोयाबीन दरात घसरण झाली असून 5200 ते 5500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर सध्या बाजारात नमूद केला जात आहे. काही ठिकाणी याहीपेक्षा कमी दर नमूद केला जात आहे. खरं पाहता, सोयाबीनचा मोठा उत्पादक देश अर्जेंटिना मध्ये दुष्काळी परिस्थिती तयार झाली असल्याने. त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र देशांतर्गत दर स्थिर राहिले. दरम्यान सोयाबीनचा प्रमुख उत्पादक देश अर्जेंटिना मध्ये उत्पादनात घट होणार असली तरी देखील ब्राझीलमध्ये उत्पादनात वाढ होणार असल्याचा नवीन अंदाज समोर आला असल्याने जागतिक बाजारात देखील दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे.
मात्र असे असले तरी यंदा भारतातून विक्रमी सोयापेंड निर्यात होणार असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. परंतु असे असले तरी आगामी काही दिवसात भारतातून नेमकी किती सोया पेंड निर्यात होते याची स्पष्टोक्ती समोर येणार असल्याने तेव्हाच सोयाबीन दराबाबत योग्य तो अंदाज बांधता येणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान वायदे बंदीमुळे देखील सोयाबीन दरात चांगलीच घसरण झाली असून पुन्हा एकदा वायदे सुरू झाले तर 300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत ची वाढ होऊ शकते असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. शिवाय देशात खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध झाला असल्यानेही दरात मंदी असल्याचे सांगितले जात आहे.
निश्चितचं सोयाबीन दरात मंदीसाठी अनेक घटक कारणीभूत ठरत आहेत. परंतु तरीदेखील जाणकार लोकांनी दरवाढीचा आपला अंदाज कायम ठेवला आहे. जाणकार लोकांच्या मते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ते 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर यंदा सोयाबीनला मिळणार असून शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आपल्या मालाची विक्री करणे यासाठी अपरिहार्य राहणार आहे.