Soybean News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सोयाबीन या खरीप हंगामातील मुख्य पिकावर सर्वाधिक मदार असल्याचे चित्र आहे. याची लागवड आपल्या राज्यात सर्वाधिक आहे. मात्र या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान आज देखील देशांतर्गत सोयाबीन बाजार दबावात पाहायला मिळाला. दरात शंभर ते दोनशे रुपयांची घसरण आज नमूद करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांच्या मते सलग तीन ते चार दिवस बाजार बंद असल्याने आज देखील पूर्ण क्षमतेने सोयाबीनचे व्यवहार सुरू झाले नसल्याने ही नरमाई पाहायला मिळाली आहे. मात्र सोयाबीन दरात येत्या काही दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जेंटिना मध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असल्याने त्या ठिकाणाहून सोयापेंड निर्यात कमी होईल.
अर्जेंटिना हा प्रामुख्याने सोया पेंड निर्यात करत असतो. यामुळे सोया पेंड दर वाढतील. त्यामुळे भारतीय सोया पेंडला देखील मागणी चांगली राहणार आहे. यामुळे देशात सोयाबीनची मागणी देखील वाढू लागली आहे. तज्ञ लोक सांगत आहेत की सोया पेंड निर्यात वाढत असल्याने सोयाबीनची मागणी देशात वाढत असून दरात थोडीशी सुधारणा होत आहे. या सोबतच भारत सरकार देखील लवकरच एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
तज्ञ लोकांच्या मते केंद्र शासनाच्या माध्यमातून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. निश्चितच खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ झाली तर देशांतर्गत खाद्यतेलाला आधार मिळेल, आयात कमी होईल. यामुळे सोयाबीनला देखील याचा आधार मिळेल. यामुळे सोयाबीनचे दर आता यापेक्षा खाली येणार नाहीत असं तज्ञ नमूद करत आहे. मात्र असे असले तरी उद्योग जाणून-बुजून सोयाबीनचे दर दबावात आणत आहे.
सध्या स्थितीला सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळणे अपेक्षित होते. परंतु सध्या याहीपेक्षा कमी दर मिळतं असल्याने सोयाबीन उत्पादक चिंतेत सापडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आढावा घेत टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करण्याचा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.