Soybean Rate Hike : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसांपासून दरवाढीच्या आशा बाळगून आहेत. मात्र सध्या देशांतर्गत सोयाबीन बाजार भाव स्थिर आहेत. तसेच जागतिक बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र जाणकार लोकांनी सोयाबीन दरवाढीचा अंदाज वर्तवला आहे. बाजार अभ्यासकांच्या मते सोयाबीन दरात या महिन्यातच वाढ होऊ शकते.
म्हणजेच जानेवारीतचं दरात वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. निश्चितच यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड तेजीत असल्याचे चित्र आहे. पण दरात चढ-उतार होत आहे. काल सोयापेंडच्या दरात घसरण झाली. घट झाली असली तरीदेखील सोया पेंड दर तेजीतच असल्याचे जाणकारांचे मत आहे. सोया तेलाच्या दरातही काल वाढ नमूद करण्यात आली आहे.
म्हणजेच सोयापेंड, सोयाबीन, अन सोयाबीन तेल तेजीत असून देखील देशाअंतर्गत सोयाबीन दर स्थिर आहेत. यामुळे कुठं ना कुठे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दरवाढीबाबत संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. मात्र यांच्या मते जानेवारी महिन्यातच दरात वाढ होईल.
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर तेजीत होते. मात्र आपल्या भारतात सोयाबीन बाजार भाव स्थिर होते. याचं प्रामुख्याने कारण असं की मागील वर्षाचा साठा आणि यावर्षीची होत असलेली खरेदी यातून उद्योगांची गरज भागत होती. हे समीकरण डिसेंबर पर्यंत सुरू होत. मात्र आता उद्योगाची गरज भागवण्यासाठी उद्योगाला मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करावे लागेल आणि यासाठी दर वाढवावे लागतील.
कमी बाजारभावात शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली नसल्याने कुठे ना कुठे बाजारात आता आवक कमी असल्याने मागणीनुसार पुरवठा होणार नाही आणि यामुळे दरात वाढ होईल. याशिवाय देखील काही जागतिक घटक दरवाढीसाठी कारणीभूत ठरणार आहेत. चीन मधून मागणी वाढण्याची शक्यता आहे, तसेच अर्जंटीना मध्ये दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली असल्याने त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादन घटणार आहे.
यामुळे जानेवारीच्या शेवटी दरात वाढ होण्याचा अंदाज काही तज्ञांनी वर्तवला आहे. जाणकार लोकांच्या मते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतची भावपातळी गृहीत धरून शेतकऱ्यांनी विक्रीचे नियोजन आखला पाहिजे. निश्चितच दरात खूप मोठी वाढ होण्याची शक्यता नाही.
गेल्या वर्षी ज्या पद्धतीने विक्रमी दर मिळाला होता तसा दर यावर्षी मिळणार नसल्याचे एकंदरीत चित्र उभं झाला आहे. यामुळे कुठे ना कुठे सोयाबीन उत्पादक संकटातच आहेत. मात्र सध्या मिळत असलेल्या दरापेक्षा 500 ते 600 रुपयांची दरवाढ शेतकऱ्यांना साहजिकच दिलासा देणारी आहे. दरम्यान जाणकार लोकांनी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात सोयाबीन विक्री करू नये असं शेतकऱ्यांना सांगितल आहे.