Farmer Success Story:- आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असतात. व्यवस्थापन करताना ते वेळेत आणि नेमकेपणाने केले तर अगदी कमीत कमी क्षेत्रात आणि कमी खर्चामध्ये भरपूर उत्पादन शेतकरी मिळवतात आणि लाखोत उत्पन्न घेतात.
तसेच या दोन्ही गोष्टींसोबत दर्जेदार बियाण्याची निवड हे देखील तितकेच गरजेचे असते. अशाप्रकारे जर पिकांच्या बाबतीत आपण तुर या पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड केली जाते.
तूर दाळीचा वापर दैनंदिन वापरात होत असल्याने मागणी देखील चांगली असते व आपण जर मागील वर्षापासूनचा विचार केला तर तुरीला उत्तम बाजारभाव मिळत असल्याने तूर लागवड शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदा देणारी ठरू शकते.
महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तूर लागवड केली जाते व मुख्य पीक म्हणून आणि आंतरपीक अशा दोन्ही प्रकारे तूर लागवडीचे क्षेत्र महाराष्ट्रात सध्या आपल्याला वाढताना दिसून येत आहे.
अगदी या सगळ्या मुद्द्याला धरून जर आपण आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र धोंडे यांची यशोगाथा बघितली तर त्यांनी अडीच एकर क्षेत्रात तूर लागवड केली व पंचवीस हजार रुपये खर्च करून त्यांना कमीत कमी या तुरीपासून दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु या सगळ्या उत्पादनामध्ये आणि मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये त्यांचे परफेक्ट असे नियोजन खूप कामी आले.
या शेतकऱ्याने घेतले तुरीचे भरघोस उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र अशोक धोंडे यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर शेती आहे. त्यांचे वडील हे सरकारी नोकरीमध्ये होते व त्यामुळे राजेंद्र यांचे शिक्षण देखील बाहेर झाले व त्यामुळे त्यांना शेतीमध्ये लक्ष देता आले नाही.
त्यामुळे त्यांनी ती शेती दुसऱ्याला बटाईने दिलेली होती.परंतु या माध्यमातून त्यांना खूपच कमी उत्पन्न हाती लागत होते. त्यामुळे आता काय करावे या विचारात असताना त्यांनी ती शेती स्वतः करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे राजेंद्र धोंडे स्वतः आष्टी कृषी कार्यालय मध्ये सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा त्यांनी स्वतः शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तूर लागवड करावी हे निश्चित केले व जुलै महिन्यात अडीच एकर क्षेत्रात गोदावरी जातीच्या तुरीची लागवड केली. या तूर नियोजनामध्ये त्यांनी व्यवस्थापनावर प्रचंड भर दिला व जिद्द तसेच मेहनतीच्या जोरावर आज त्यांना काही हजार रुपये खर्च करून उत्पन्न मात्र लाखात मिळेल अशी परिस्थिती आहे.
तूर नियोजनामध्ये त्यांनी तुरीचे शेंडे खुडल्याने उत्पन्नात वाढ कशी होते हे दाखवून दिले. यामध्ये तालुका कृषी अधिकारी असलेले राजेंद्र सुपेकर यांनी तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेंडे खुडणे किती महत्त्वाचे हे आहे हे त्यांना सांगितले व त्यानुसार व्यवस्थापन आणि नियोजन करत त्यांनी पुढच्या झाडांची शेंडे खुडली व जवळपास या माध्यमातून 40 टक्के उत्पन्न वाढले.
जवळपास अडीच एकर साठी त्यांनी 25 हजार रुपये खर्च केला व आता दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न हाती येईल अशी अपेक्षा त्यांना आहे.याविषयी बोलताना त्यांनी म्हटले की,शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आता अवगत झाले
असल्याने तरुणांनी मोबाईल सारख्या गॅजेटमध्ये इतर गोष्टींवर वेळ न घालवता मोबाईलच्या माध्यमातून शेती विषयक माहिती मिळवावी व तेवढा वेळ स्वतःहून शेतीला द्यावा. असे जर तरुणांनी केले तर शेतीसारखा पैसा कुठेच नाही हे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. शेतीमध्ये स्वतः लक्ष दिले तर शेती उत्तम आहे असे देखील त्यांनी म्हटले.