St Employee News : एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासनात विलीनीकरण करणे या आपल्या प्रमुख मागणीसाठी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. या संपातून एसटी कर्मचाऱ्यांची शासनात विलीनीकरणाची मागणी तर मान्य होऊ शकली नाही पण कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्यात आली. शिवाय राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी घेण्यात आली.
परंतु गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचे चित्र होते. राज्य शासनाकडून महामंडळाला वेळेत निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होत नव्हते. वेळेत वेतन मिळण्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या संपकाळात मान्य झाल्या होत्या त्या मागणींवर देखील निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला नाही.
अशा परिस्थितीत पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. एसटी कर्मचाऱ्यांकडून आत्मक्लेष आंदोलन सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आत्मकलेश आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसमवेत राज्य शासनाकडून चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. यावेळी कर्मचाऱ्यांकडून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देणे तसेच राज्य शासनाने ज्या 16 मागण्यावर सहमती दाखवली आहे त्या मान्य कराव्यात अशी मागणी पुन्हा करण्यात आली.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी यावेळी दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत राज्य सरकार एसटी महामंडळाला पगारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली आहे. म्हणजे पाच तारखेपर्यंत राज्य शासनाकडून वेतनासाठी आवश्यक निधी महामंडळाला उपलब्ध होईल आणि एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री महोदय यांनी यावेळी दिली.
निश्चितच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. पण इतर अन्य प्रलंबित मागणीसंदर्भात अजून शासनाकडून निर्णय झालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.