Agri Related Business:- आजकालची तरुणाई शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊल ठेवत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून लाखोत आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. परंतु शेती करत असताना अशा तरुणांनी जर शेतीशी निगडित असलेले इतर व्यवसाय केले तर नक्कीच या माध्यमातून दुहेरी लाभ होऊ शकतो.
शेतीशी निगडित असलेल्या व्यवसायांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये बरेचसे व्यवसाय आहेत आणि ते देखील कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात.परंतु त्या माध्यमातून मिळणारा नफा मात्र लाखोत असतो. याप्रमाणे तुम्ही देखील शेती व्यवसाय करत असाल आणि शेतीशी निगडित असलेला एखादा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही मशरूम लागवडीचा पर्याय निवडू शकतात.
हा व्यवसाय असा आहे की यामध्ये तुम्ही कमी पैशात भरपूर नफा मिळवू शकतात. सध्या जर आपण बाजारपेठेतील मशरूमची मागणी बघितली तर ती खूप जास्त असल्याने येणाऱ्या कालावधीत या व्यवसायाला खूप मोठी संधी आहे. महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायाकरिता तुम्हाला खूप मोठी जागा किंवा शेत जमिनीची देखील गरज भासत नाही.
अगदी घरामध्ये नियोजन करून देखील तुम्ही मशरूम शेती करू शकतात. तसेच याकरिता तुम्हाला प्रशिक्षण देखील उपलब्ध आहे. साधारणपणे तुमच्याकडे जर पन्नास हजार रुपये असतील तर या गुंतवणुकीतून तुम्ही मशरूम व्यवसाय आरामात सुरू करू शकतात.
कशी कराल मशरूम शेतीची सुरुवात?
या व्यवसायातून जर तुम्हाला चांगला पैसा मिळवायचा असेल तर सगळ्यात अगोदर मशरूम लागवडीचे जे काही तंत्रज्ञान आहे हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे व त्या तंत्रज्ञानाचा अवलंब जर तुम्ही मशरूम शेती किंवा मशरूम लागवडीत केला तर नक्कीच तुम्हाला भरपूर असा फायदा मिळतो.
साधारणपणे हा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला चाळीस बाय तीस फूट आकाराची जागा लागेल व या जागेमध्ये तीन तीन फूट रुंदीचे रॅक बनवावे लागतील व या रॅकमध्ये सेटअप करून तुम्हाला मशरूमची लागवड करता येते.
मशरूमचे उत्पादन जर बघितले तर प्रति चौरस मीटर जागेतून दहा किलो मशरूम उत्पादन मिळते. विशेष म्हणजे मशरूम लागवड किंवा मशरूम शेती करिता तुम्हाला सरकारी अनुदान देखील उपलब्ध आहे व या अनुदानाचा लाभ घेऊन तुम्ही आरामात मशरूम लागवड किंवा मशरूम शेतीचा व्यवसाय करू शकता.
मशरूम शेतीसाठी कंपोस्ट असते महत्त्वाचे
मशरूम लागवडीकरिता सगळ्यात आधी तुम्हाला कंपोस्ट खताची गरज भासते व ते तुम्हाला तयार करावे लागते. याकरिता साधारणपणे भाताच्या पेंढ्याचा वापर केला जातो. याकरिता तुम्हाला अगोदर भाताचा पेंढा भिजवावा लागतो व एका दिवसानंतर त्यामध्ये डीएपी तसेच युरिया, पोटॅश व गव्हाचा कोंडा तसेच जिप्सम इत्यादी मिसळून तो पेंढा कुजण्याकरिता ठेवला जातो.
साधारणपणे दीड महिन्याच्या कालावधीत त्यापासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते. अशाप्रकारे त्यात शेणखत आणि माती सारख्या प्रमाणात मिसळून दीड इंच जाडीचा थर देऊन त्यावर दोन ते तीन इंच जाडीपर्यंत कंपोस्ट खत टाकले जाते यावर मशरूम लागवड करून मशरूम उगवले जाते.
या कंपोस्टमध्ये ओलावा टिकावा याकरिता दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याची फवारणी करावी लागते आणि दोन इंच कंपोस्टचा थर याकरिता आवश्यक असतो. अशाप्रकारे तुम्ही मशरूमची उत्पादन घेऊ शकतात.
मशरूम शेतीचे प्रशिक्षण कुठे मिळते?
तुम्हाला जर मशरूम लागवडीबद्दल काहीही माहिती नसेल तर तुम्ही व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन सुरुवात करणे गरजेचे आहे. देशातील सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रामध्ये मशरूम लागवडीचे ट्रेनिंग दिले जाते.
तुम्हाला जर जास्त भांडवल टाकून मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन सुरुवात करणे गरजेचे आहे.
पन्नास हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होतो हा व्यवसाय
मशरूम लागवडीचा किंवा मशरूम शेतीचा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख रुपये पर्यंतची गुंतवणूक आवश्यक असते.या व्यवसायाकरिता तुम्ही सरकारच्या माध्यमातून 40 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ घेऊ शकतात तसेच कर्ज देखील याकरिता मिळवू शकतात.
तुम्ही जर तंत्रज्ञानाच्या मदतीने मशरूम शेती केली तर तुम्ही लाखो रुपयांची कमाई या माध्यमातून करू शकतात. कमाईच्या दृष्टिकोनातून बघितले तर तुम्ही जर शंभर स्क्वेअर फुट क्षेत्रामध्ये मशरूम लागवड केली असेल तर एका वर्षासाठी तुम्ही एक लाख ते पाच लाख रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळवू शकतात. विशेष म्हणजे याकरिता जास्त मनुष्यबळाची आवश्यकता नसते. घरातील महिला वर्ग देखील हा व्यवसाय आरामात सांभाळू शकतात.