कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणी करीता आवश्यक असलेली आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येत असून यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा समावेश आहे.
जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये पायाभूत सोयी सुविधांची उभारणी होते तेव्हा त्या क्षेत्राचा विकास होत असतो. अगदी हीच बाब कृषी क्षेत्राला देखील लागू होते. त्यामुळे कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.
अशाच कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या योजनांच्या बद्दल बघितले तर यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना देखील एक महत्त्वाची योजना आहे व ही योजना आता नव्याने सुरू करण्यात आलेली आहे.
रोपवाटिका व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे एक शाश्वत साधन देखील मिळू शकते व योजनेच्या माध्यमातून अनेक उद्देश देखील पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचे उद्देश्य पाहिले तर या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीड व रोगमुक्त रोपे पुरवून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे तसेच रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे
व त्यासोबतच पिक रचनेमध्ये बदल घडवून आणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे इत्यादी उद्देश आपल्याला सांगता येतील.
कशी आहे या योजनेची व्याप्ती?
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व तालुक्यात रोपवाटिका स्थापन करणे याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत व सदर योजनेअंतर्गत 822 लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे व प्रत्येक तालुक्यात कमीत कमी एक नर्सरी म्हणजेच रोपवाटिका उभारणे प्रस्तावित आहे.
काय आहे लाभार्थी निवडीचा निकष?
1- या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची कमीत कमी 0.40 हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.
2- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोपवाटिका उभारण्याकरिता पाण्याची कायमची सोय असणे देखील गरजेचे आहे.
लाभार्थी निवडीसाठी काय आहे प्राधान्यक्रम?
1- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेमध्ये निवडीचा प्राधान्यक्रम पहिला तर यामध्ये महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहणार आहे.
2- त्यानंतर महिला गट आणि महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य राहणार आहे.
3- भाजीपाला उत्पादक, अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य देण्यात येणार आहे.
कोणते आहेत समाविष्ट घटक?
या योजनेमध्ये टोमॅटो, वांगी तसेच कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिकेची उभारणी करणे महत्त्वाचे आहे.
किती मिळेल अनुदान?
1- 3.25 मीटर उंचीचे फ्लॅट टाईप शेडनेट गृह( सांगाडा उभारणी करिता)- 1000 चौरस मीटरकरिता प्रति चौरस मीटर 475 रुपये= एकूण खर्च चार लाख 75 व यावर या योजनेतून मिळणारे अनुदान आहे 2 लाख 37 हजार पाचशे रुपये
2- प्लास्टिक टनेल पावर– 10 चौरस मीटर करिता 60 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे एकूण प्रकल्प खर्च 60 हजार रुपये व मिळणारे अनुदान तीस हजार रुपये
3- नॅपसॅक स्प्रेयर– (एकूण संख्या एक)- लागणारा खर्च 7600 व त्यावर मिळणारे अनुदान तीन हजार आठशे रुपये
4- प्लास्टिक क्रेट्स– 62 क्रेट्स व प्रतिक्रेट्स दोनशे रुपये खर्च असे मिळून 12,400 प्रकल्प खर्च व त्याकरिता मिळणाऱ्या अनुदान 6200
असे विविध घटकांतर्गत या योजनेत दोन लाख 77 हजार पाचशे रुपये अनुदान मिळू शकते.
अधिक माहितीसाठी कुठे करावा संपर्क?
या योजनेच्या अधिक माहिती करिता गावचे कृषी सहाय्यक तसेच नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला भेट देणे गरजेचे आहे.