State Employee News : महाराष्ट्र राज्यातील शिक्षण सेवकांच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती हाती आली आहे. शिंदे फडणवीस सरकारने शिक्षण सेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष बाब अशी की या निर्णयाचा जीआर अर्थातच शासन निर्णय देखील मंगळवारी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे.
यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा मुद्दा निकाली काढला गेला आहे. यामुळे शिक्षणसेवकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डिसेंबर 2022 मध्ये उपराजधानी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र त्यावेळी शासनाकडून जीआर जारी झाला नव्हता. आता या निर्णयाचा जीआर म्हणजे शासन निर्णय काढण्यात आला असून याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. सदर शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2023 पासून राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शिक्षण सेवकांच्या मानधनात 2011 पासून वाढ झालेली नव्हती.
खरं पाहता शिक्षण सेवक हे पद 2000 पासून सेवेत रुजू झालं आहे. म्हणजे 2000 सालापासून शिक्षण सेवक नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे. जे नियमित शिक्षक असतात त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मानधन मिळत असते मात्र जे शिक्षण सेवक असतात त्यांना मिळणार मानधन हे नेहमीच शिक्षकांच्या तुलनेत खूपच नगण्य होते. अशा परिस्थितीत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केली जावी अशी मागणी वारंवार केली जात होती.
एवढेच नाही तर औरंगाबाद खंडपीठाने देखील शिक्षण सेवकांना दिल जाणार मानधन हे नगण्य असल्याचे सांगत त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा आणि दर चार वर्षांनी यामध्ये सुधारणा करण्याचा आदेश निर्गमित केला होता. दरम्यान आता हिवाळी अधिवेशनात यावर शिंदे फडणवीस सरकारने सकारात्मक निर्णय घेतला असून मंगळवारी या निर्णयाचीं अंमलबजावणी करणे संदर्भात सविस्तर शासन निर्णय देखील जाहीर झाला आहे.
यासोबतच खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात देखील वाढ झाली आहे. या कर्मचाऱ्यांना देखील 2005 नंतर मानधन वाढ मिळालेली नव्हती. आता या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली आहे. दरम्यान आता आपण शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगारात किती वाढ झाली आहे याच्या विषयी जाणून घेणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की प्राथमिक व उच्च प्राथमिक पर्यंतच्या शिक्षण सेवकांना आतापर्यंत मात्र सहा हजार रुपये एवढं वेतन मिळत होतं. मात्र आता दहा हजार रुपये प्रतिमाह एवढी वाढ देण्यात आली आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना आता 16 हजार रुपये प्रति महिना एवढ वेतन मिळणार आहे.
माध्यमिक पर्यंतच्या शिक्षण सेवकांना आतापर्यंत आठ हजार रुपये एवढे वेतन मिळत होतं. त्यांच्या वेतनात देखील दहा हजाराची वाढ झाली आहे यामुळे आता त्यांना 18000 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.
उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय पर्यंतच्या शिक्षण सेवकांना 9,000 रुपये एवढा वेतन आत्तापर्यंत मिळत होतं मात्र यामध्ये तब्बल 11,000 ची वाढ झाली आहे आणि आता या शिक्षण सेवकांना वीस हजार रुपये मासिक वेतन दिल जाणार आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली इतकी वाढ
कनिष्ठ लिपिक :- आतापर्यंत दोन हजाराचे वेतन त्यांना मिळत होतं मात्र यामध्ये वाढ झाली असून आता दहा हजार एवढे वेतन मिळणार आहे.
ग्रंथपाल :- 1500 ते 2500 दरम्यान वेतन आतापर्यंत दिला जात होतं मात्र आता 14 हजार रुपये वेतन मिळणार आहे.
प्रयोगशाळा सहाय्यक :- आतापर्यंत 2000 ते 2500 दरम्यान वेतन मिळत होतं मात्र यामध्ये वाढ झाली असून बारा हजार रुपये आता वेतन मिळणार आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी :- या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 1700 रुपये एवढं वेतन मिळत होतं मात्र आता आठ हजार रुपये एवढे वेतन मिळणार आहे.