State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून ज्या जुन्या पेन्शन योजनेबाबत महाराष्ट्रात गदारोळ सुरू आहे तो गदारोळ आता दूर होणार आहे. राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता नवीन सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याला यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणून ओळखले जाणार आहे. शिंदे सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा मोठा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
विशेष म्हणजे याची अंमलबजावणी मार्च 2024 पासून होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील जवळपास 17 ते 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे आनंदाचे भाव पाहायला मिळत आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दोन दिवसांपूर्वी अर्थातच 24 ऑगस्टला केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच युपीएस योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता केंद्रा प्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
काल सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन झाले होते. याच बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर ही युनिफाईड पेन्शन स्कीम ओल्ड पेन्शन स्कीम आणि न्यू पेन्शन स्कीम या दोन्ही पेन्शन योजनांचे मिश्रण आहे.
सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीमला आधीच्या दोन्ही योजनांचे सर्वोत्तम मिश्रण असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत आता आपण युनिफाईड पेन्शन स्कीम नेमकी कशी आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कशी आहे युनिफाईड पेन्शन स्कीम?
युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत 25 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या मागील बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50% एवढी पेन्शन मिळणार आहे. मात्र ज्यांनी 25 वर्षांपेक्षा कमी सेवा दिली आहे आणि दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिली आहे अशा कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे.
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा निवृत्तीनंतर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्याच्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम सुद्धा मिळणार आहे. अर्थातच यूपीएस मध्ये कौटुंबिक निवृत्तीवेतनाचा समावेश आहे.
UPS मध्ये सेवानिवृत्तीवर एकरकमी रक्कम (ग्रॅच्युइटीपासून वेगळी) देखील दिली जाणार आहे. कर्मचाऱ्याच्या प्रत्येक 6 महिन्यांच्या सेवेसाठी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या (DA) 10व्या भागानुसार त्याची गणना केली जाणार आहे.