स्पेशल

तरुण शेतकऱ्याचा शेती मधला कौतुकास्पद प्रयोग ! थंड हवामानातील स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला उष्ण हवामाणात, पहा ही भन्नाट यशोगाथा

Success Story : स्ट्रॉबेरी म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभ राहत ते थंडगार महाबळेश्वराचे चित्र. वास्तविक स्ट्रॉबेरी पिकासाठी थंड हवामान अनुकूल आहे. यामुळे महाबळेश्वर सारख्या थंड प्रदेशात याची शेती सर्वाधिक पाहायला मिळते. पण काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे.

आता शेतीमध्ये अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे ज्याच्या मदतीने विपरीत हवामानात देखील शेतकऱ्यांना शेती करता येणे शक्य बनले आहे. असाच काहीसा प्रयोग वर्धा मध्ये देखील पाहायला मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने थंड हवामानातीलच स्ट्रॉबेरी पीक वर्धा सारख्या उष्ण हवामानात यशस्वीरित्या घेऊन दाखवलं आहे.

यामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील या प्रयोगशील शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. खरं पाहता वर्धामध्येच नाही तर नाशिक जिल्ह्यातील मिनी कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळवण तालुक्यातही मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे मळे अलीकडे पाहायला मिळत आहेत. याव्यतिरिक्त साक्री तालुक्यातील पिंपळनेर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी पाड्यावरील शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाची शेती करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या स्ट्रॉबेरी पिकामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील मौजे कात्री येथील तरुण शेतकरी महेश शंकरराव पाटील याने आपल्या वावरात स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला आहे. विशेष म्हणजे यातून त्याला चांगलं उत्पन्न देखील मिळाला आहे. वर्धा सारख्या उष्ण हवामानात स्ट्रॉबेरीची शेती शक्य आहे हेच या तरुण शेतकऱ्याने आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून जगाला दाखवून दिल आहे. महेश यांनी आपल्या पाऊण एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.

त्यांनी खरं पाहता प्रायोगिक तत्त्वावर याची लागवड केली मात्र स्ट्रॉबेरीचा चांगला मळा फुलला यामुळे त्यांच्या आशा आता द्विगुणीत झाल्या असून प्रायोगिक तत्त्वावरील ही शेती त्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देणार आहे. महेश हे तीन वर्षांपूर्वी नोकरी करत होते. मात्र नोकरीत मन रमलं नाही म्हणून वडिलोपार्जित अठरा एकर शेतीत आपलं करिअर घडवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या अनुषंगाने तीन वर्षांपूर्वी त्यांनी नोकरीवर तुळशीपत्र ठेवलं आणि शेती कसण्यास सुरवात केली. सुरुवातीला शेतीमध्ये महेश यांनी वेगवेगळे प्रयोग देखील केलेत. याच प्रयोगाचा स्ट्रॉबेरी शेती हा देखील एक भाग आहे.

महाबळेश्वर येथे होण्यासाठी गेलेल्या महेशला त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी दिसली आणि स्ट्रॉबेरी शेती विषयी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण झाली. मग काय या पिकाची त्यांनी माहिती जमवली आणि आपल्या शेतात प्रयोग करून पाहू असं त्यांनी ठरवलं. थंड हवामानात उगवणारी ही स्ट्रॉबेरी उष्ण हवामानात येणार का असा प्रश्न सुरुवातीला महेश यांना पडला होता. मात्र तरीदेखील त्यांनी आपल्या पाऊण एकर शेत जमिनीत महाबळेश्वर येथून रोपे मागवून या पिकाची लागवड केली. विशेष म्हणजे लागवड केल्यानंतर त्यांनी स्ट्रॉबेरी पिकासाठी रासायनिक ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केला.

दरम्यान आता या स्ट्रॉबेरी पिकातून त्यांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे. महेश यांच्या मते त्यांना जवळपास दीड ते दोन लाखांचा खर्च स्ट्रॉबेरी पिकासाठी येणार आहे. दरम्यान त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्ट्रॉबेरी पिकाची शेती जर त्यांना फायदेशीर ठरली तर भविष्यात स्ट्रॉबेरीचा मळा अजून मोठ्या क्षेत्रावर फुलवला जाईल आणि यातून चांगले उत्पादन मिळेल यासाठी प्रयत्न केले जातील. विशेष बाब अशी की शेती कसण्यासाठी महेश यांना त्यांच्या धर्मपत्नीचा देखील मोठी साथ लाभली आहे.

विशेषता महेश यांच्या धर्मपत्नी त्यांना स्ट्रॉबेरी विक्रीच्या कामात मदत करत आहेत. स्ट्रॉबेरी विक्रीसाठी त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला असून यातून त्यांना फायदा देखील होत आहे. एकंदरीत महाबळेश्वर सारख्या थंड हवामानातील स्ट्रॉबेरी पीक वर्ध्यासारख्या उष्ण हवामानात देखील योग्य नियोजन आखलं तर घेतलं जाऊ शकतं हेच महेश यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवल आहे. 

अब ये बात तो दूर तलक जायेगी ! युवा शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग ; पिकावर चक्क देशी दारुचीं केली फवारणी, आता पीक आलं फुल टू जोमात

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts