Success Story : राज्यातील शेतकरी पारंपरिक पिकांच्या शेती सोबतच भाजीपाला वर्गीय पिकांची देखील शेती करतात. कमी दिवसात काढण्यासाठी तयार होणाऱ्या या पिकाची शेती मात्र अनेकदा शेतकऱ्यांना तोट्याची सिद्ध होते. अनेकदा चांगला भाजीपाला पिकतो मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असल्याने अपेक्षित असा बाजार भाव भाजीपाल्याला मिळत नाही.
परिणामी पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता येत नाही. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याच्या मौजे पळसखेड येथील एका महिला शेतकऱ्याला देखील असाच अनुभव आला. भाजीपाल्याला बाजारात अनेकदा कमी दर मिळत असल्याने या महिलेला तोटा सहन करावा लागला. परिणामी त्यांनी यावर कायमचे समाधान काय राहील यासाठी शोधाशोध सुरू केली.
अशातच कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना भाजीपाल्यावर प्रक्रिया करता येते असं समजलं. कृषी विभागातील तज्ञ लोकांकडून भाजीपाल्याचे निर्जलीकरण करून मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येत असल्याची माहिती देण्यात आली. भाजीपाला शेतीत कायमचं नुकसान सहन करावे लागत असल्याने या महिला शेतकऱ्याने कृषी विभागाच्या या सल्ल्यानुसार भाजीपाला निर्जलीकरण करून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी प्रकल्प सुरू केला आहे. वंदना पाटील असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून आजच्या घडीला या प्रकल्पाच्या माध्यमातून या महिला शेतकऱ्याला चांगली कमाई होत आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून वंदना भाजीपाल्याची पावडर तयार करून बाजारात विक्री करत आहेत. यामुळे वंदना यांना महिन्याकाठी सर्व खर्च वजा करून पन्नास हजाराची कमाई होत आहे. विशेष म्हणजे गावातील दहा महिलांना रोजगार देखील त्यांनी दिला आहे. वंदना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न योजनेचा लाभ घेत सहा लाखांचे कर्ज काढले. पैशांची उभारणी झाल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.
गायत्री फूड उद्योग असे या व्यवसायाला नाव दिल असून बाजारातील मागणी लक्षात घेऊन त्या वेगवेगळ्या भाज्या निर्जलीकरण करून त्यापासून पावडर तयार करत आहेत. काही भाज्या त्या केवळ कोरड्या करून विकतात. कांदा, टमाटा, बिट, शेवगा पाला, मेथी, पालक, कोथींबीर, कढी पत्ता, आलं इत्यादी भाजीपाला निर्जलीकरण करून पावडर बनवून या गायत्री फूड उद्योगाच्या माध्यमातून ही महिला शेतकरी बाजारात विकल्या जात आहेत. या मूल्यवर्धित भाज्यांची पावडर नायट्रोजन गॅसच्या मदतीने पॅकिंग केल्यास एक वर्षेपर्यंत वापरली जाऊ शकते असा दावा वंदना यांनी केला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचा हा प्रकल्प सुरू असून रोजाना त्यांच्या उत्पादनाची मागणी वाढत आहे. या व्यवसायातून महिन्याकाठी दोन लाखांची उलाढाल ते करत असून निव्वळ नफा पन्नास हजाराचा त्यांना राहत आहे. निश्चितच एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे आणि बाजारात मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधव संकटात असतानाच वंदना पाटील यांनी प्रक्रिया उद्योगात संधी शोधून केलेली ही कामगिरी इतरांसाठी प्रेरक राहणार आहे.